लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (सन २०१२) दाखल झालेल्या खटल्यातील, जिल्ह्य़ातील पहिली शिक्षा येथील न्यायालयाने आज सुनावली. अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या अस्तगाव (ता. पारनेर) येथील संतोष रखमाजी ऊर्फ आबा देठे (वय ३३) याला या कायद्याच्या कलम ७ व ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. यू देबडवार यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रमेश जगताप यांनी काम पाहिले. लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ अन्वये दाखल झालेल्या खटल्यात जिल्ह्य़ात प्रथमच शिक्षा सुनावली गेल्याचे जगताप यांनी सांगितले.
अस्तगावात २२ मार्च २०१३ रोजी ही घटना घडली. गावातच, जवळच राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलीस आबा याने घरात बोलवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व नंतर शिवीगाळ करून कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने घरी आजीला हा प्रकार सांगितला. मुलीची आई नगरमधील एका खासगी रुग्णालयात काम करते. आजीने मुलीच्या आईला घटना सांगितली. मुलीच्या आईने पारनेर पोलिसांकडे फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुळूक यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात ४ साक्षीदार तपासण्यात आले. संतोष ऊर्फ आबा देठे याला भादवी कलम ३५४ अ अन्वये व लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा