महापालिकेतर्फे मंगळवारपासून सुरू केल्या जात असलेल्या हेरिटेज वॉक या उपक्रमात अनेक बेकायदेशीर बाबींचा अवलंब झाल्याचा आरोप करून या उपक्रमाचा स्थानिक नगरसेवकांनी सोमवारी निषेध केला. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता मर्जीतील संस्थेला काम मिळावे, यासाठीच हा उपक्रम सुरू केला जात असल्याचीही टीका करण्यात येत आहे.
पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंची ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी महापालिकेतर्फे हेरिटेज वॉक उपक्रम सुरू केला जात आहे. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी होत असून या उपक्रमाला आक्षेप घेणारी पत्रे स्थानिक नगरसेवक हेमंत रासने, मुक्ता टिळक आदींनी सोमवारी आयुक्तांना दिली. महापालिकेकडे तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगून ‘जनवाणी’ या संस्थेला हेरिटेज वॉक हा संपूर्ण उपक्रम चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यापोटी महापालिका संस्थेला लाखो रुपये देणार आहे. मात्र, हे काम त्याच संस्थेला मिळावे या हेतूने महापालिकेने या उपक्रमासाठी निविदा प्रक्रियाच राबवली नाही. हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी जनवाणी या संस्थेला द्यावी, असे थेट विषयपत्र आणून प्रशासनाने ते स्थायी समितीकडून मंजूर करवून घेतले, असा आक्षेप आहे.
मुळातच हा आर्थिक विषय असताना त्यासाठी खुली निविदा प्रक्रिया का राबवण्यात आली नाही आणि विशिष्ट संस्थेच्या नावाने विषयपत्र कसे ठेवण्यात आले, असे आक्षेप रासने यांनी घेतले आहेत. इतर संस्थांना या प्रक्रियेत सहभागी होता येऊ नये, अशा पद्धतीनेच ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. हा उपक्रम तीन प्रभागांमध्ये राबवला जाणार आहे. त्या प्रभागांच्या लोकप्रतिनिधींना तसेच महापालिका अधिकाऱ्यांना या उपक्रमाची कल्पना नाही, त्यांच्याशी चर्चाही नाही आणि काही स्वयंसेवी संस्थांबरोबर चर्चा करून हा उपक्रम सुरू केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. काही अधिकारी आणि काही संस्थांच्या मनमानीचा हा प्रकार असून त्याचा आम्ही निषेध करतो, असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा