‘थिन फिल्म’ प्रक्रियेमधील अद्ययावत प्रगती व तंत्रज्ञान’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
यशवंतराव मोहिते महाविद्यालयात ‘थिन फिल्म (अतिपातळ पृष्ठ स्तर) प्रक्रियेमधील अद्ययावत प्रगती व तंत्रज्ञान’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले. ए.आर.डी.ई. पुणेचे अतिरिक्त संचालक डॉ. एस. व्ही. गाडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. चर्चासत्रात कर्नाटक विद्यापीठाचे डॉ. मोहंमद राबिनल, पुणे विद्यापीठाचे डॉ. प्रा. एस. आय. पाटील, डॉ. प्रा. जाडकर, डॉ. हबीबी पठाण, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. जयदीप साळवी, सिनेट चे डॉ. मिलिंद कुलकर्णी, एस. आर. टी. एम. विद्यापीठाचे डॉ. प्रा. राजाराम माने यांची व्याख्याने झाली.
शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे ‘लोकमान्य फेस्टिव्हल’
शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान ‘लोकमान्य फेस्टिव्हल’ लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ येथे साजरा होणार आहे.
 फेस्टिव्हलचे उद्घाटन १६ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ढोल-लेझीम खेळ या पारंपरिक पद्धतीने होणार आहे. दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, दांडिया स्पर्धा होणार आहेत. अभिनेते जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, सुबोध भावे आधी कलाकार या वेळी उपस्थित राहणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी २५ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे.
‘कृतिद्वारे शिक्षण’ वीरकर प्रशालेचा अभिनव उपक्रम
सौ. सुशीलाबाई वीरकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कलाशिक्षणातून मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा सराव होण्यासाठी प्रशालेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत दसरा-दिवाळीनिमित्त रविवारची सुट्टी मनोरंजनासोबतच व्यावयायिक शिक्षण देण्यासाठी हस्तकौशल्यावर आधारित शुभेच्छापत्रे बनविणे, पणत्या बनविणे, आकाशकंदील बनविणे हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन सिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
आर्थिक मदतीचे आवाहन
महेश अनिल मोरे हा हृदयविकाराने ग्रस्त आहे. उपचारासाठी अंदाजे तीन लाख रुपये खर्च येणार असून त्याचे कुटुंबीय हा खर्च करण्यास असमर्थ आहेत. मदतीसाठी इच्छुक व्यक्तींनी (९८५०४४६३६२) या क्रमांकावर संपर्क साधावा.
निरंतर शिक्षण केंद्राचे उद्घाटन
रोटरी क्लब ऑफ वेस्ट साइडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या निरंतर शिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमांर्तगत क्लबच्या वतीने मळवली येथील श्रीमती शांतिदेवी गोपीचंद विद्यालयास कॉम्पुटर, एलसीडी प्रोजेक्टर असे विविध शिक्षणोपयोगी साहित्य देण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद इनामदार, शिरीष कर्णिक उपस्थित होते.
विकास चोथे यांच्या शोधनिबंधाची निवड
सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ एज्युकेशनच्या वतीने २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान अमेरिकेत होत असलेल्या ‘मिनिंग गोल्डन अपॉच्र्युनिटी हेल्थ एज्युकेशन पॉलिसी, रिसर्च अँड प्रॅक्टिस’ या वार्षिक परिषदेसाठी पुण्यातील विकास राजेंद्र चोथे यांच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली आहे. ‘क्वेशन ऑफ इंडियन अॅडोल्सन्ट्स अबाउट मेनस्ट्रेशन’ या विषयावरील निबंध ते सादर करणार आहेत. या परिषदेत भारतातील पौगंडावस्थेतील मुलींच्या आरोग्याविषयीच्या समस्या, मासिक पाळीचे प्रश्न, सामाजिक गैरसमज आणि संबंधित सुधारणा आदी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चोथे करणार आहेत.
बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन
राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने सर्वपित्री अमावस्येनिमित्त ४१ बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून संगम घाटावर विसर्जन करण्यात आले. महापालिका सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उखाजी सोनवणे, अजय तायडे, लता राजगुरू, प्रदीप गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.