मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ताहाराबाद येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेसह इतर उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या महाविद्यालयांना हा पुरस्कार दिला जातो. पुणे विद्यापीठातून चार महविद्यालयांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात कुलगुरूंच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. आर. कापडणीस यांनी पुरस्कार स्वीकारला. ताहाराबादसारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयाची पुणे विद्यापीठामार्फत निवड होणे ही आमच्यासाठी तसेच संस्थेच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ. कापडणीस यांनी व्यक्त केली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एस. महाले यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. दोन वर्षांत महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दोन गावे दत्तक घेऊन विद्यापीठाच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी राबविल्या. ग्रामस्वच्छता अभियान स्त्रीभ्रूण हत्या, ग्रामविकास, वृक्षारोपण, गाजरगवत निर्मूलन, प्रौढ शिक्षण आदिवासी विकास, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अशा विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी प्रामाणिक व पारदर्शक काम केल्यास कोणतेही यश हमखास मिळते. वास्तविक पाहता ताहाराबाद हे आदिवासी भागातील नवीन महाविद्यालय असून सोयीसुविधाही कमी आहेत. तरीही त्यांचा विचार न करता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत राहिलो. त्यामुळेच आमचे महाविद्यालय या पुरस्काराचे मानकरी ठरले, असे प्राचार्य डॉ. कापडणीस यांनी नमूद केले. महाविद्यालयास पुरस्कार मिळाल्याबद्दल ताहाराबादचे सरपंच संदीप साळवे व सोसायटी सभापती के. पी. जाधव यांनी प्राचार्याचा सत्कार केला. उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. बी. एस. महाले यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Story img Loader