गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला. सुमारे दोन हजार मूर्ती व निर्मल्यांचे दान, डीजे ऐवजी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या झालेला गजर, मिरवणुकीतील पूर्ण गुलालबंदी त्या ऐवजी काही मंडळांनी केलेली फुलांची उधळण, विविध मंडळापुढे सादर झालेले आकर्षक कार्यक्रम ही अकोल्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची वैशिष्टय़े ठरली.
गेल्या अनेक वर्षांपासून अकोले शहरात मूर्ती आणि निर्माल्यदानाचा उपक्रम राबविला जातो. प्रवरानदीवर नदीपात्रात विधिवत विसर्जन केल्यानंतर मूर्ती नदीच्या पाण्यात सोडण्याऐवजी एकत्र जमा केल्या जातात. अकोले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे काम करतात. याही वर्षी या महाविद्यालयाच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अधिकारी बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार मूर्ती संकलित केल्या. नंतर महाविद्यालयाच्या तलावात या मूर्तीची योग्य प्रकारे विसर्जन करण्यात आले. तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी यावेळी तीन ट्रॉली निर्माल्यही गोळा केले. या निर्माल्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी नऊपासूनच भाविकांनी घरगुती गणपतीच्या विसर्जनास सुरुवात केली. येथील मॉडर्न हायस्कुल तसेच अगस्ती विद्यालयाच्या विसर्जन मिरवणुका नेहमीप्रमाणेच आकर्षणाचा केंद्र ठरल्या. मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझीम, झांज, टिपरीनृत्य, झेंडानृत्य, लाठी-काठी, गीते आदी सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षणाचा विषय ठरले. काही मंडळांपुढे असणाऱ्या ढोल व झांज पथकांनी लोकांची मने आकर्षून घेतली. पोलीस निरीक्षक नारायण वाखारे व गृहरक्षक दलाच्या समादेशक पुष्पा नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Story img Loader