राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसकडून आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. सुधीर तांबे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीच ही माहिती दिली. सुधीर तांबे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत.

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. राधाकृष्ण विखे पाटील सध्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला त्यांच्या विरोधात उमेदवार कोण, असा यक्षप्रश्न काँग्रेससमोर होता. सुरुवातीला सत्यजित तांबे, त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांची नावे चर्चेत होती.

राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणूक राहता मतदारसंघातून लढवणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस सुधीर तांबे यांना मैदानात उतरवणार आहेत. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “राहता मतदारसंघातून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातील असेल. आमदार सुधीर तांबे उभे राहणार आहे,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. सुधीर तांबे हे सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.

 

Story img Loader