शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी जगभरातून शनिभक्त येतात. मनोकामना पूर्ण व्हाव्यात, संकटनिवारण व्हावे म्हणून तेल, नारळ अर्पण करतात. दानपेटीत पैसे टाकतात. त्यामुळे शनैश्वर देवस्थान हे भरभराटीला आले आहे. आता राज्यातील अष्टविनायक, शिर्डी या श्रीमंत देवस्थानांच्या यादीत या संस्थानाचाही समावेश झाला आहे. मात्र, देवस्थानच्या विश्वस्तांनीच मनमानी कारभार सुरु केला आहे. आजी व माजी अशा १९ विश्वस्तांनी पात्रता नसताना सग्यासोयऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रांना नोकरी घेतले आहे. त्याची आता चौकशी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळ गेल्या १० वर्षांपासून संस्थानमध्ये कार्यरत आहे. पूर्वी ३० ते ३५ कोटी रुपये संस्थानच्या तिजोरीत होते. पण आता ही तिजोरी रिकामी व्हायला लागली आहे. कधी शिक्षण संस्थांना मदत तर, कधी बंधाऱ्याच्या कामासाठी पैशाचा वापर, अशा एक ना अनेक  करामती संस्थानमध्ये घडल्या आहेत. पण आता आजी-माजी विश्वस्तांच्या मनमानी नोकरभरतीवर प्रकाश पडला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर व शिवसेनेचे बाळासाहेब पवार यांनी नुकतीच विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन संस्थानच्या कारभाराचा पाढा वाचला. मंत्री पाटील यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश दिला.
संस्थानचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी आण्णासाहेब दरंदले,  उपाध्यक्ष सोपान भागवत बानकर, सचिव बाळकृष्ण गणपत येळवंडे, विश्वस्त पोपट रामचंद्र शेटे, नितीन सुर्यभान शेटे, दादासाहेब धोंडीराम दरंदले, रंगनाथ किसन शेटे, भाऊसाहेब आप्पासाहेब दरंदले, राजाभाऊ गंगाधर दरंदले तसेच माजी विश्वस्त पंढरीनाथ राजू शेटे, (स्व.) भिमराज बळवंत दरंदले, वेणुनाथ यादव बानकर, रावसाहेब बाजीराव शेटे, रावसाहेब उर्फ साहेबराव दरंदले, बाळासाहेब यशवंत बोरुडे, एकनाथ किसन दरंदले, भाऊसाहेब शंकर शेटे, दगडू किसन शेटे, सुरेश बाबुराव बानकर यांनी नातेवाईकांना संस्थानच्या नोकरीत घेतले. हे दहावीपर्यंत शिकलेले आहेत, काहीच पदवीधर आहेत. पात्रता नसताना त्यांना सेवेत घेण्यात आले. भरमसाठ पगार त्यांना देण्यात आले. कर्मचारी नेमणूक करताना सर्व नियम बाजूला ठेवण्यात आले, अशी तक्रारही दिनकर यांनी  केली आहे.
जाहिरातींवर कोटय़वधी खर्च
संस्थानने कोटय़ावधी रुपयाचा जाहिरातीवर खर्च केला आहे. धार्मिक संस्थानांना आवश्यक तेवढय़ाच जाहिराती देण्याचे बंधन आहे. पण साखर कारखान्याप्रमाणे विश्वस्तांनी मनमानी पध्दतीने जाहिरातींवर खर्च केला आहे. या प्रकाराचीही चौकशी करावी, अशी मागणी दिनकर यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा