ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा निर्माण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील घोषणेनंतर आता यवतमाळ जिल्ह्य़ाचे विभाजन करून पुसद जिल्हा निर्माण करण्याची मागणी जोर धरणार असल्याचे चित्र आहे. पुसद जिल्ह्य़ासाठी १९८५ पासून मागणी करीत असलेल्या जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, १९९१ ते १९९३ या काळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतांना त्यांच्या कार्यकालाच्या उत्तरार्धात पुसद जिल्ह्य़ाची निर्मिती होणार होती. मात्र, यवतमाळ जिल्ह्य़ाचे विभाजन करून पुसद हा जिल्हा निर्माण करावा की, अकोला जिल्ह्य़ाचे विभाजन करून वाशीम जिल्हा निर्माण करावा आणि वाशीम जिल्ह्य़ातच पुसद तालुक्याचा समावेश करावा, या बाबतीत निर्माण झालेला घोळ दूर करण्यास विलंब होऊन सुधाकरराव नाईकांचे मुख्यमंत्रीपद गेले. १९९५ मध्ये सेना-भाजप युतीचे मनोहर जोशी सरकार सत्तारूढ झाल्यावर जोशी सरकारने १९९८ मध्ये कारंजा, मानोरा, वाशीम, रिसोड, मंगरुळपीर आणि मालेगाव या सहा तालुक्यांचा समावेश असलेल्या व वत्सगुल्म नावाने प्राचीन काळात ख्यात असलेल्या वाशीम जिल्ह्य़ाची निर्मिती वसंतराव नाईकांच्या जन्मदिनी म्हणजे १ जुलला करून टाकली आणि त्याचे श्रेय घेतले. तेव्हापासून पुसद जिल्ह्य़ाचीही निर्मिती व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पुसद जिल्ह्य़ात महागाव, उमरखेड, दिग्रस, पुसद, दारव्हा, या तालुक्यांचा समावेश होऊ शकेल शिवाय, पुसद तालुक्याचे विभाजन करून काळी दौलत खान तालुका झाल्यास याचाही समावेश पुसद जिल्ह्य़ात होईल.
पुसद हे विदर्भातील एज्युकेशन सिटी म्हणून प्रसिध्द आहे. जिल्ह्य़ासाठी आवश्यक मूलभूत सोयी आजच उपलब्ध आहेत. साखर कारखाने, अतिरिक्त जिल्हा न्यायालयापासून तर शिक्षणाच्या विविध शाखांचे प्रचंड जाळे येथे विणलेले आहे. खंडळा, जवळा, मारवाडी, खानापूर, सिंगद, उमरी, दिग्रस, शेंदूरजना, कान्हा, काळी दौलत खान, महागाव, कलगाव, सावरगांव, आसोली, मोरथ, शेंबाळिपपरी, मुळावा, अशी शहरे ज्या नदीमुळे पुसद हे नाव पडलेले ती पुस नदी जनतेची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्राला ११ वर्षांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री लाभलेले वसंतराव नाईक दोन वर्ष मुख्यमंत्री लाभलेले सुधाकर नाईक हे पुसदचेच होते. सुधाकरराव तर हिमाचल प्रदेशचे राज्यपालही होते. सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री हेही पुसदचेच आहेत.
पुष्पावती नगरी म्हणून ओळख असलेल्या पुसदपासून ४५ किलोमीटरवर नांदेडला ५६ कि.मी. अंतरावर अकोल्याला विमानतळ आहे. प्रस्तावित वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग पुसदहून जाणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पुसद जिल्ह्य़ाची मागणी जोर धरणार आहे. दरम्यान, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनीही यवतमाळ जिल्ह्य़ाचे विभाजन करून पुसद जिल्हा निर्मितीची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, उत्तम प्रशासनासाठी छोटे जिल्हे अतिशय उपयुक्त ठरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा