लग्न झाले असेल तर पत्नी व मुलांचे वा आई-वडिलांची छायाचित्रे समोर ठेवून गाडी चालवा. त्यामुळे जबाबदारीची जाणीव येऊन गाडी सावकाश चालवाल, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली आणि उपस्थित स्कूल बस चालकांनी ही सूचना उचलून धरली. यापुढे आम्ही आमच्या समोर जवळच्या व्यक्तींची छायाचित्रे ठेवू, असे आश्वासनही दिले.
सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधून वाहतूक शाखेच्या डी. एन. नगर विभागामार्फत स्कूल बस चालक तसेच स्कूल व्हॅन चालक, मदतनीस आणि मालकांची बैठक अंधेरीतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या चालकांना वाहतूक विषयक नियमांची माहिती दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विजय धात्रक यांनी ही सूचना केली. तेव्हा चालकांनी लगेच ही सूचना उचलून धरली आणि धात्रक यांना तसे करण्याचे आश्वासनही देऊन टाकले.
आंध्र प्रदेशात तेथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अशी सूचना तेथील चालकांना केली होती. त्याचा योग्य परिणाम होऊन अपघातांची संख्या कमी झाली होती. आपण विमानतळ परिसरात असतानाही अशीच सूचना तेथील चालकांना केली होती. त्याचा योग्य तो परिणाम झाला होता आणि दुर्घटनांची संख्या कमी झाली होती. अंधेरीत एका स्कूल बसला लागलेली आग वा स्कूल बसला होणाऱ्या छोटय़ा अपघातांची मालिका थांबण्यासाठीच आपण हा पुढाकार घेतल्याचे धात्रक यांनी सांगितले.

Story img Loader