रिमझिम पावसाने शुक्रवारी उघडीप दिल्याने महापालिकेला रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सवड मिळाली. हे काम करतानाही प्रशासनाने खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ होण्याची व्यवस्था करून ठेवली. प्रमुख रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये मुरूम टाकून, तर काही ठिकाणी माती टाकून डागडुजीचा प्रयत्न केला गेला. अवजड वाहनांमुळे अनेक खड्डय़ांमधील मुरूम लगेच बाहेरही आला.
सीबीएस ते अशोकस्तंभ या रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये शुक्रवारी प्रशासनाकडून बारीक मुरूम टाकण्यात आला. अनेक लहान-मोठय़ा खड्डय़ांमुळे या रस्त्याची पुरती चाळणी झाल्याने वाहनधारकांकडून खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी काही ठिकाणी खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करण्यासारखे आंदोलनही केले होते. पावसाने उघडीप देताच पालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली, परंतु हे काम करताना योग्य पद्धतीचा वापर करण्यात येत नसल्याने काही वेळातच तो मुरूम खड्डय़ांबाहेर येत असल्याने बारीक खडी रस्त्यांवर पसरली. ही खडी दुचाकी वाहनधारकांची परीक्षा पाहणारी ठरली. त्यातच पुन्हा सरी कोसळल्यास खड्डे कायम राहण्याचीच शक्यता अधिक. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या या बनवाबनवीबद्दल नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

Story img Loader