‘बाजारात तुरी.. अन् भट भटणीला मारी’ अशी अवस्था मिरज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस संघटनेची झाली असून वचनपूर्ती मेळाव्यावेळी झालेल्या हमरी-तुमरीवरून जोरदार वादंग उठले आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरविलेल्या वचनपूर्ती मेळाव्याच्या व्यासपीठावर कोणाचा आणि किती आकाराचा फोटो लावला यावरून हे वादंग निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मिरजेची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला येत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच मोच्रेबांधणी सुरू केली आहे. गेल्या सप्ताहात काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यानिमित्त जाहीरसभेचे आयोजन मिरजेच्या किसान चौकात करण्यात आले होते. या निमित्ताने काढण्यात आलेल्या रथयात्रेच्या स्वागतप्रसंगी व्यासपीठावर छायाचित्र कोणाचे आणि किती आकाराचे यावरून हमरीतुमरी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या आनंदा डावरे यांनी सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून वचनपूर्ती रथयात्रेवेळी आपली छबी झळकविण्याचा त्यांचा प्रयत्न काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पटला नाही.  गेल्या वेळी निवडणूक लढवून पराभूत झालेल्या बाळासाहेब व्होनमोरे या काँग्रेस कार्यकर्त्यांने डावरे यांच्या भूमिकेला आक्षेप नोंदवित बहिष्कार टाकला. त्यांच्यासोबतच दयाधन सोनवणे, डॉ. नामदेव कस्तुरे, सिद्धार्थ जाधव, सदाशिव वाघमारे, श्रीमती यमुताई िशगे आदींनी वचनपूर्ती मेळाव्यावर बहिष्कार टाकीत पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
ही घटना घडल्यानंतर जागे झालेल्या शहर काँग्रेस कमिटीत बरीच खलबते झाली. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रफिक मुजावर यांनी मेळाव्यावर बहिष्कार घालणाऱ्या ६ जणांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. पक्ष शिस्त मोडून गरवर्तन केल्याप्रकरणी आपणाला ६  वर्षांसाठी पक्षातून निलंबित का करू नये अशी नोटीस बजावली आहे. खुलाशासाठी १५ दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एकतर्फी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या नोटिशीच्या प्रती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धाडण्यात आल्या आहेत.
दरम्यान आम्हाला पक्षातून काढण्याचा श्री. मुजावर यांना कोणताही अधिकार नसल्याचे सांगत श्री. बाळासाहेब व्होनमोरे यांनी हा बदनामीचा कट असल्याचा आरोप केला आहे. अशा पद्धतीचे आरोप अन्य ५ जणांनी केले आहेत.
अद्याप लोकसभा निवडणूक जाहीर व्हायची आहे. त्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीबाबतचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपाचा विषय होईल. मुळात विधानसभा निवडणुकीला अद्याप १०  महिन्यांचा अवधी असताना काँग्रेस कार्यकर्त्यांतील हमरी-तुमरी म्हणजे ‘बाजारात तुरी.. अन् भट भटणीला मारी’ अशीच म्हणावी लागेल.