उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात तापमानात काहिशी घट झाली असून वारे वाहत असल्याने उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना काहिसा दिलासा मिळत आहे. रोहिणी नक्षत्र लागून चार दिवसांचा कालावधी उलटला, मात्र, अद्याप मान्सूनपूर्व पावसाचे संकेत नाही. पाणी टंचाई व उन्हाचे चटके सहन करणाऱ्या सर्वाना आता पावसाची प्रतीक्षा आहे.
रोहिणी नक्षत्र सुरू होऊन पावसाचे कोणतेही लक्षण दिसत नसल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे. उत्तर महाराष्ट्रात रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ अशा काही भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तथापि, उर्वरित सर्वच भागात अजुनही उन्हाची धग जाणवत आहे. दिवसा ऊन, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री वाहणारे वारे, अशी सध्याची स्थिती आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाची एखादी सर आली तरी पाऊस वेळेवर येणार आणि दमदार बरसणार, असा ठोकताळा ग्रामीण भागात आजही मानला जातो. ढगाळ हवामान व वातावरणात वाढलेल्या आद्र्रतेमुळे शेतीला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवडय़ापासून ढगाळ वातावरण व अधुनमधून वाहणारी जोरदार हवा यामुळे वातावरणात बदल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आद्र्रतेत वाढ झाली आहे. यंदा सलग तीन महिने उत्तर महाराष्ट्राने टळटळीत उन्हाची दाहकता अनुभवली. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये १ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ४०. ६ अंश तापमानाची नोंद झाली होती. हंगामातील या सर्वोच्च तापमानाच्या तुलनेत पारा सध्या ४ ते ५ अंशांनी खाली आला आहे. नाशिकचे तापमान ३५ अंशाच्या आसपास स्थिरावले आहे. मागील चार वर्षांतील उन्हाळ्यात सर्वोच्च तापमानाचा आढावा घेतल्यास सलग तीन वर्षांपासून हे तापमान ४० अंशाच्या आसपास असल्याचे लक्षात येते. १६ एप्रिल २०१० रोजी नाशिकचा पारा सर्वाधिक म्हणजे ४२ अंशावर होता. त्यापुढील २०११ या वर्षांत २७ एप्रिल रोजी तापमान ४०.४ अंश होते. २०१२ मधील हंगामात ८ एप्रिल रोजी सर्वोच्च म्हणजे ४० अंशांची नोंद झाली होती. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या या माहितीवर नजर टाकल्यास नाशिकच्या सर्वाधिक तापमानाची पातळी ४० अंशाच्या जवळपास स्थिरावल्याचे दिसते.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा ४५ अंशापर्यंत गेलेल्या तापमानात काहिशी घट झाली असली तरी दिवसा उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. वातावरणात बदल होत असले तरी जळगावकरांची उकाडय़ातून पूर्णत: सुटका झालेली नाही. काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यातील काही भागास वादळी पावसाने झोडपून काढले होते. यामुळे तापमान काहिसे कमी झाले असले तरी आता तितक्याच तीव्रतेने उकाडय़ाचा सामना करावा लागत आहे. त्यातच,
अनेक भागात भारनियमन सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मान्सून दाखल होण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड व मालेगाव परिसरात तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशाच्या दरम्यान आहे. रोहिणी नक्षत्राने बळीराजाची निराशी केली असून सध्या ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. आकाशात ढग जमा होऊ लागल्याने स्थलांतरीत मजुरांनी आपल्या गावांची वाट धरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा