वसमत नगरपालिकेच्या अध्यक्षा कुमुदिनी बडवणे यांनी राजीनामा दिल्याने आता २१ जानेवारीला नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. पालिकेत भाजप-शिवसेनेचे स्पष्ट बहुमत असले तरी आता साई एंटरप्रायझेस या बनावट कंपनीकडून १५ लाखांचे विद्युत साहित्य खरेदी केल्याप्रकरणी मंत्रालयात धूळखात पडलेल्या फाईलने पुन्हा डोके वर काढले आहे. यातील दोषी सदस्यांवर कारवाईची तलवार असल्याने भाजप-शिवसेना युतीला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वसमत पालिकेत भाजप-सेनेला बहुमत मिळाले. या दोन्ही पक्षांमधील तडजोडीत पहिले वर्ष अध्यक्षपद शिवसेनेला, तर उर्वरित दीड वर्ष भाजपला देण्याचा अलिखित करार झाला. त्याप्रमाणे बडवणे यांचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी २१ जानेवारीला मतदान होणार असून, भाजपातर्फे सुषमा बोड्डेवार या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाली असतानाच पालिकेने साई एंटरप्रायझेस या बनावट कंपनीकडून सुमारे १५ लाखांचे विद्युत साहित्य खरेदी केले. या प्रकरणी तक्रारी केल्या जाताच तत्कालीन जिल्हाधिकारी शैला रॉय यांच्यासमोर सन २०१० मध्ये २१ जून व २६ जुलै या दोन दिवशी सुनावणी झाली. या वेळी ही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे उघडकीस आले. हे प्रकरण बरेज गाजले. परंतु दोषींवर कारवाई न होता याची फाईल मंत्रालयात धूळखात पडून होती. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, सदस्य व मुख्याधिकारी दोषी आढळून आले. त्यांच्यावर कारवाई झालीच, परंतु सेना-भाजपचे सुनील काळे व शिवदास बोड्डेवार तसेच काँग्रेसच्या गीताबाई गवळी हे तीन सदस्य नवीन सभागृहात निवडून आले आहेत. या फाईलने डोके वर काढल्याने या तिघांचेही पद आता धोक्यात आले आहे.

Story img Loader