८७७ पैकी अवघे १११ निकाल घोषित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अनेक परीक्षांचे निकाल धक्कादायक असून लाखो रुपयांचा खर्च करून केवळ इतरांच्या मनोरंजनासाठी विद्यापीठ परीक्षा घेते की काय अशी शंका या निकालावरून येत आहे. शिक्षकांचा संप सुरू होण्यापूर्वी ज्या काही पदव्युत्तर प्रमाणपत्र किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या त्यांचेच निकाल आतापर्यंत घोषित करण्यात आले आहेत.
एकूण ८७७ परीक्षांपैकी केवळ १११ परीक्षांचे निकाल आजच्या तारखेत घोषित करण्यात आले आहेत. अनेक प्रमाणपत्र किंवा पदविका अभ्यासक्रमांना बोटावर मोजण्याइतपतच विद्यार्थी बसले होते तर काही परीक्षांना नियमित विद्यार्थ्यांचा अभाव असून केवळ माजी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्या परीक्षा घेतल्या जातात. वाणिज्य विद्याशाखेतील ‘डिप्लोमा इन बँकिंग मॅनेजमेंट’चा १०० टक्के निकाल लागला कारण परीक्षेत केवळ एकच विद्यार्थिनी होती व ती उत्तीर्ण झाली. ‘पदव्युत्तर पदविका कार्यालयीन व्यवस्थापन’ या परीक्षेतील दोन विद्यार्थी नापास झाले तर ‘पीजी डिप्लोमा इन टॅक्सेशन’मधील केवळ तीन विद्यार्थी होते तेही नापास झाले म्हणून दोन्ही परीक्षेचा शुन्य टक्के निकाल लागला. काही अभ्यासक्रमांना चांगले विद्यार्थी आहेत. जसे ‘पीजी डिप्लो. इन फायनान्स मॅनेजमेंट’मध्ये एकूण ३४ विद्यार्थी. पैकी एक नियमित आणि एक माजी विद्यार्थी उत्तीर्ण झाला. सर्व विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असताना निकाल केवळ ५.८८ टक्के लागला.
आश्चर्याची बाब म्हणजे गृह विज्ञान विद्याशाखेतील अनेक परीक्षांचे निकाल एक तर ५० टक्के किंवा १०० टक्के असेच आहेत. ‘बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझाईन अंतिम(जुना)’ या विषयाचा १०० टक्के निकाल आहे. कारण दोनच विद्यार्थिनी होत्या आणि त्या दोन्ही उत्तीर्ण झाल्या. ‘पीजी डिप्लोमा इन क्वालिटी अॅश्युरन्स ऑफ कॉस्मेटिक भाग-दोन’चा १०० टक्के निकाल आहे. कारण एकच विद्यार्थिनी होती व ती उत्तीर्ण झाली. ‘बॅचलर ऑफ खादी प्रॉडक्शन अॅण्ड डिझाईन भाग-१’मध्ये एकूण दोन विद्यार्थिनी होत्या. त्यातील एक अनुत्तीर्ण झाल्याने ५० टक्के निकाल राहिला. विधि विद्याशाखेतही असेच मजेशीर निकाल आहेत. ‘पीजी डिप्लोमा इन टॅक्सेशन(लॉ)’ला एकूण सह विद्यार्थी पण सर्व नापास झाल्याने निकाल शून्य टक्के.
‘पीजी डिप्लोमा इन एचआर डय़ुटीज अॅण्ड एज्युकेशन’मध्ये एकूण तीन विद्यार्थी होते. परीक्षेला एकच उपस्थित होता. तोही अनुत्तीर्ण झाल्याने निकाल शुन्य टक्के लागला. ‘पीजी डिप्लोमा इन बँकिंग लॉ’साठी तीनच विद्यार्थी होते. पैकी एक उत्तीर्ण झाला तेव्हा निकाल ३३.३३ टक्के लागला तर ‘पीजी डिप्लोमा इन सायबर लॉ अॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये एकूण पाच विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ६० टक्के आहे. ‘पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल अॅण्ड इन्टॅक्चुअल प्रॉपर्टी’ या विषयाचा निकाल मात्र १०० टक्के लागला. परीक्षेला एकच माजी विद्यार्थी होता आणि तो उत्तीर्ण झाला.
विज्ञान विद्या शाखाही गमतीशीर निकालांच्याबाबतीत मागे नाही. ‘पीजी डिप्लोमा इन अप्लाईड बॉटनी’मध्ये एकच नियमित विद्यार्थी असताना तो परीक्षेला गैरहजर होता.
‘पीजी डिप्लोमा इन पंचायतराज अॅडमिनिस्ट्रेशन’ एकही नियमित विद्यार्थी नव्हता. माजी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणून निकाल १०० टक्के लागला.
तसेच ‘सर्टिफिकेट इन सोशल वेल्फेअर भाग दोन’ या विषयातील चारही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल १०० टक्के घोषित झाला.
विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
८७७ पैकी अवघे १११ निकाल घोषित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अनेक परीक्षांचे निकाल धक्कादायक असून लाखो रुपयांचा खर्च करून केवळ इतरांच्या मनोरंजनासाठी विद्यापीठ परीक्षा घेते की काय अशी शंका या निकालावरून येत आहे. शिक्षकांचा संप सुरू होण्यापूर्वी ज्या काही पदव्युत्तर प्रमाणपत्र किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या त्यांचेच निकाल आतापर्यंत घोषित करण्यात आले आहेत.
First published on: 19-06-2013 at 09:22 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question mark on importance of university exams