भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुष्काळी परिक्रमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत होणार नाही, अशी परिक्रमा करण्यास पक्षाची परवानगी व त्यासाठी लागणारा निधी यावरही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. ही परिक्रमा होणार का, या प्रश्नाचे उत्तर नेत्यांनाच माहीत असेल. अजून काहीही ‘आदेश’ नाहीत, असे आवर्जून सांगितले जाते.
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी राजनाथसिंह यांची निवड झाल्यानंतर मुंडे यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना जाणवत होता. परंतु उत्साह मात्र अलीक डे नसल्याचे सांगितले जाते. आता तर दुष्काळी परिक्रमेवरही प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे. पक्ष पातळीवरून असा काही कार्यक्रम नजीकच्या काळात होण्याची शक्यताच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाडय़ातील दुष्काळाच्या अनुषंगाने मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याने मोर्चा रद्द झाला. त्यानंतर अधून-मधून आंदोलन केले जाईल, अशी आश्वासने दिली जात.
दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणा हैराण झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडय़ात भाजप म्हणून मात्र एकही उपक्रम घेण्यात आला नाही. शिवसेनेला दुष्काळग्रस्तांचा आक्रोश दिसला.
राजकीय प्रतिमा घडविता यावी आणि दुष्काळी भागातील संघटन व्हावे म्हणून शिवसेनेने जालना येथे मेळावा घेतला. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनीही पदयात्रा सुरू ठेवल्या. राष्ट्रवादीचे नेते तर दररोज एक निवेदन घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटी घेत आहेत. विशेषत: विद्यार्थी वर्गाला आकर्षित करता येईल, अशी निवेदने पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण देत आहेत. त्यांच्या मागण्याला मंत्री राजेश टोपे दाद देत आहेत. फक्त भाजपच्या गोटातच सारे काही शांत-शांत आहे. ज्या दिवशी नेते शहरात येतात, तेव्हा त्यांच्या पुढे गर्दी केली जाते.
पक्षपातळीवर काहीच कार्यक्रम नसल्याने थंडावल्यासारखे वातावरण आहे. गोदावरीला पूर आल्यावर गोदा परिक्रमा करून सर्वसामांन्यांचे अश्रू पुसणारा नेता, अशी गोपीनाथ मुंडे याची प्रतिमा आता गोदावरी कोरडी पडेपर्यंत कायम होती.
दुष्काळग्रस्त भागात मुंडेंचा दौरा पक्ष संघटनेतही उत्साह दुणावणारा ठरू शकेल, असे काही दिवसांपूर्वीपर्यंत सांगितले जात होते. तथापि प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचाच शब्द अंतिम मानला जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने ही परिक्रमा तूर्त होणार नसल्याचे सांगितले जाते. मुंडे राज्याबाहेर असल्याने परिक्रमेच्या अनुषंगाने काहीच तयारी सुरू नाही.
मुंडेंच्या दुष्काळी परिक्रमेवर प्रश्नचिन्ह!
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुष्काळी परिक्रमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत होणार नाही, अशी परिक्रमा करण्यास पक्षाची परवानगी व त्यासाठी लागणारा निधी यावरही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. ही परिक्रमा होणार का, या प्रश्नाचे उत्तर नेत्यांनाच माहीत असेल. अजून काहीही ‘आदेश’ नाहीत, असे आवर्जून सांगितले जाते.
First published on: 15-02-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question mark on mundes tour to drought