आर्णी तालुक्यातील पहिल्याच पावसात अरुणावती, अडाण, पैनगंगा, नद्या ओसंडून वाहू लागल्याने नदी काठच्या व नाल्या काठच्या नागरिकांची तारांबळ उडाली आणि तालुक्यात पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
 नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. नदीला पूर आल्यानंतर गावाच्या मध्यभागी असलेला नाला भरून वाहतो. पहिल्याच पावसात अरुणावती ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने आर्णी शहरात हाहाकार माजला. सुमारे शंभर घरात पुराचे पाणी घुसले. मात्र, मोठे नुकसान झाले नाही. परंतु पुरामुळे पुन्हा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंत्री शिवाजीराव मोघे व जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वेळा आश्वासन देऊनसुद्धा सुमारे ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न शासन दरबारी धूळ खात पडला आहे. आर्णी ग्रामपंचायत असताना अनेक वेळा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, या प्रश्नाकडे केवळ जागेअभावी दुर्लक्ष करण्यात आले. पुनर्वसन करणाऱ्या कुटुंबाची यादी दरवर्षी वाढत आहे. सुमारे १०८० कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे असताना केवळ महापूर आल्यावर व घरात पाणी शिरल्यावरच याबाबत चर्चा केली जाते, अन्यथा प्रशासन याबाबत उदासीनता दाखविते हे आजपर्यंतच्या कार्यावरून स्पष्ट झालेले आहे.
अरुणावती नदीला महापूर आल्यानंतर नदी काठच्या व नाल्या काठच्या लोकांमध्ये नेहमी भीतीचे वातावरण असते. शासनाची ३२ एकर जागा शिल्लक असताना पुनर्वसनाबाबत मात्र कार्यवाही होताना दिसत नाही.
एक हजार कुटुंबाचे पुनर्वसन शासनाने त्वरित करावे त्यासाठी खासगी जमीन घेण्याची पाळी आली तरी तसा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे आहे.
मात्र, शासनाच्या नियमामुळे हा प्रश्न जागेअभावी रखडला आहे यात शंका नाही.
पहिल्याच पावसात अडाण नदीच्या काठावरील गणगाव, तरोडा, शेलू, ब्राम्हणवाडा, शेकलगाव, म्हसोला, पहूर, बोरगाव (पूंजी), अरुणावती नदीच्या काठावरील सायखेडा, चिकणी, भंडारी, काढोडा, आर्णी, आमणी, अतरंगाव, आसरा, विढोली, यरमाळ, भंडारी (शिवर), पैनगंगा नदीच्या काठावरील मुकिंदपूर, कवठाबाजार, साकुर, राणीधानोरा, दातोडी, कवढा (बु), पळशी, खडका, आयता, चिमटा आदी गावांना नद्या ओव्हर फ्लो झाल्यावर मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. या दृष्टीने प्रशासनाचे या गावावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा