हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले असले, तरी रेणुका-पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे तोडणी वाहतूकदार व शेतक-यांनी गत हंगामातील प्रतिटन ५० रुपये मागणी केली असल्याने या कारखान्याच्या हंगामावर सध्या प्रश्नचिन्ह लागले आहे. रेणुकाच्या अध्यक्षा विद्या मुरकुंबी यांनी अन्य कारखान्यांप्रमाणे २ हजार २५० रुपये देण्याची तयारी शेतक-यांशी रविवारी दोन टप्प्यात झालेल्या चच्रे वेळी दर्शविली. तथापि, उभय गट आपल्याच मतावर ठाम राहिल्याचे सायंकाळपर्यंत दिसून आले.
रेणुका-पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा आढावा घेण्यासाठी मुरकुंबी या रविवारी गंगानगर येथील कार्यस्थळी आल्या होत्या. याची माहिती समजल्यावर विद्यासागर पाटील, प्रवीण कदम (इंगळी), शिवगोंड पाटील (निमशिरगाव), दिलीप हवालदार, विनायक पाटील (कबनूर), अशोक मगदूम (कोडोली) यांच्यासह सुमारे पन्नास तोडणी वाहतूकदार व शेतक-यांनी मुरकुंबी यांची भेट घेऊन चर्चा केली.
चालू गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूकीसाठी खर्चाची गरज असल्याने रेणुकाने गत हंगामातील प्रतिटन ५० रुपये द्यावेत, अशी मागणी विद्यासागर पाटील व शेतक-यांनी केली. त्यावर मुरकुंबी यांनी, यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन २ हजार २५० रुपये इतकी पहिली उचल देण्याचे मान्य केले. हंगाम सुरू झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये आणखीन ५० रुपये देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मात्र शेतकर्यानी हंगाम सुरू होतानाच ५० रुपये द्यावेत असा आग्रह धरला. याच मुद्यावरून रविवारी दोन टप्प्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. अखेर मुरकुंबी यांनी २ हजार २५० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाचे उसासाठी अनुदान आल्यास ते थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी आपली अंतिम भूमिका स्पष्ट केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा