फक्त सहा दिवसांचे कामकाज बाकी
सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाचे चारही दिवस कामकामाविना ठप्प झाल्याने उर्वरित दिवसांमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी विदर्भाचे किती प्रश्न तडीस लागणार याबद्दल शंका निर्माण झाली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला श्वेतपत्रिकेचा संघर्ष छेडला गेल्यानंतर सिंचन घोटाळा विरोधक पूर्ण ताकदीने लावून धरणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. विरोधकांनी जारी केलेली श्वेतपत्रिका आणि त्याला राष्ट्रवादीने सत्यपत्रिकेतून दिलेले उत्तर यावर राजकीय लढाई केंद्रित झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करून विरोधकांनी कामकाज बंद पाडले आहे. एसआयटी चौकशीच्या घोषणेसाठी विरोधकांनी गेले चारही दिवस सभागृहात गोंधळ घालून कामकाजात अडथळे आणल्याने उद्याचे राहिलेले एकदिवसाचे कामकाजही पाण्यात जाण्याची शक्यता दिसत आहे.
दुसऱ्या आठवडय़ात फक्त पाच दिवसांचे कामकाज होणार आहे. कोटय़वधींचा खर्च करून नागपूरला दरवर्षी हिवाळी अधिवेशन घेतले जाते. सरकारी, वाहनांवरील पेट्रोलची उधळण, मंत्र्यांची बडदास्त, रंगरंगोटी, रस्त्यांची दुरुस्ती यावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत विदर्भाच्या वाटय़ाला काहीही येत नाही हा दरवर्षीचा अनुभव आहे. भाजपने कामकाज बंद पाडण्याची भूमिका घेतल्याने चार दिवसात ‘येरे माझ्या मागल्या’ एवढीच अपेक्षा आहे, त्यापेक्षा फारसे काही मिळणार नाही, असेच चित्र आहे. विधिमंडळाचे कामकाज सिंचनात बुडाले असले तरी गोंधळातही मुंबई, मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी त्यांच्या भागातील प्रश्नांप्रती सजग असल्याचे दिसून आले. विदर्भातील मिहानचा प्रश्न चक्क विदर्भाबाहेरील शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला, याचीही चर्चा होती.
गेल्या चार दिवसात सिंचन घोटाळा, अजित पवारांची एसआयटी चौकशी, आबांचे आव्हान आणि माफीचा आग्रह याच मुद्दय़ांनी रंग भरला आहे. बुधवारी पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त झाले आणि सर्वपक्षीय भोजनावळी रंगल्या. गेल्या चार दिवसात विरोधी आमदारांपैकी एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, बबनराव घोलप यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून अजित पवार, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे यांनी पक्षनेत्यांवर हल्ले रोखण्यासाठी ढाल उभी केली आहे. प्रत्यक्षात दोन्ही सभागृहात खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झालीच नाही. विदर्भाच्या प्रश्नांचा तर दूरान्वयाने संबंध आलेला नाही. शनिवार आणि रविवारी सुटीचा दिवस असल्याने अनेकांना नेहमीप्रमाणे ‘पिकनिक’चे वेध लागले आहेत. येत्या दोन दिवसात विदर्भातील पर्यटन स्थळे, फार्म हाऊसेस फुल्ल झालेली दिसतील. पिकनिकसाठी लाल-अंबर दिव्यांच्या शासकीय गाडय़ांचा नेणाऱ्यांना यावेळी चाप बसविण्यासाठी सरकारने पुरेपूर तयारी केल्याने यंदा गाडय़ांची संख्या कमी झालेली दिसू
शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा