शिष्यवृत्तीचे पसे त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने आधार कार्ड गरजेचे बनले आहे. आधार कार्डाची सक्ती केल्यामुळे शिष्यवृत्तिधारक पहाटेपासून हे कार्ड मिळविण्यासाठी रांगा लावत आहेत.
बँक खात्यावर थेट शिष्यवृत्ती जमा करण्याचा दुसरा टप्पा १ जुलैपासून सुरू होणार असून त्यासाठी लातूर जिल्हय़ाची निवड करण्यात आली आहे. प्रशासनाने गेल्या महिनाभरापासूनच याची तयारी सुरू केली आहे. शिष्यवृत्तिधारकांना आधार कार्ड व बँक खाते सक्तीचे करण्यात आले आहे. ३ जूनपासून महसूल मंडलनिहाय लाभार्थ्यांना एकत्र करून त्यांचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात बँक अधिकारी व आधार कार्डाची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. एखाद्या विद्यार्थ्यांचे बँक खाते असेल व त्याची नोंद नसेल किंवा त्याने आधार कार्ड काढले असेल व शिष्यवृत्ती विभागात त्याची नोंद नसेल अशा सर्व बाबींची पूर्तता शिबिरातून करण्यात आली. ज्यांनी आधार कार्ड काढले नसेल अथवा बँक खाते काढले नसेल त्याची सोयही अशा शिबिरातून करण्यात आली होती.
सध्या सर्वत्र शाळा, महाविद्यालयाचा प्रवेशाचा कालावधी आहे. प्रवेशासोबतच शिष्यवृत्तिधारक विद्यार्थी आपले अर्ज भरून देतात. त्यांची शिष्यवृत्ती जमा होण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवेशाच्या वेळी त्यांना आधार कार्ड व बँक खाते काढून घ्या, असे सांगितले जाते. त्यामुळे आधार कार्ड काढून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा पहाटेपासूनच लागलेल्या दिसून येत आहेत.
शहरातील औसा रस्त्यावरील आयडीबीआय बँकेत आधार कार्ड काढण्यासाठी दोन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थी आपले नाव नोंदवून दुसऱ्या दिवशी आधार कार्ड नोंदणी केल्याचा क्रमांक मिळवितात व तो क्रमांक शाळा, महाविद्यालयात दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना तातडीची गरज आहे अशांनीच आधार कार्ड काढून घ्यावे. ज्यांना आता प्रवेश दिला जातो आहे, त्यांना आधार कार्डाची तातडीची गरज नाही. त्यांनी रांगा लावून अकारण गर्दी करू नये. त्यांच्यासाठी बराच कालावधी शिल्लक आहे, अशा सूचना सर्व शाळा, महाविद्यालयांनाही दिल्या जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी िशदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा