प्लॅटफॉर्मवर लोक शांतपणे रांगेत उभे आहेत. गाडी येते.. गाडी थांबते.. उतरणारे लोक उतरतात आणि चढणारे लोक शांतपणे एक एक करून चढतात.. कुठेही आरडाओरडा नाही, धक्काबुक्की नाही किंवा खेचाखेचीही नाही! हे दृश्य मुंबई मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरील नसून ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर सकाळी सव्वानऊच्या सुमारास दिसणारे आहे. सकाळी ९.१९ वाजता ठाण्याहून मुंबईला रवाना होणाऱ्या गाडीच्या प्रथम वर्गाच्या एका डब्यातील प्रवासी ही शिस्त थोडेथोडके दिवस नाही, तर पूर्ण वर्षभर बाळगत आहेत. लोकल गाडीत चढतानाही रांग लावण्याच्या प्रथेची सुरुवात होऊन मंगळवारी या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने या प्रवाशांनी एकत्र येत या प्रथेचा वाढदिवसही मोठय़ा थाटात आणि रांग न मोडता साजरा केला.
मुंबईच्या उपनगरीय गाडय़ांमध्ये दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचे छान गट तयार होतात. हे गट अनेकदा विविध सण-समारंभ या लोकल गाडीतच साजरे करतात. त्याचीच पुढची पायरी म्हणून ठाण्याहून ९.१९ वाजता सुटणाऱ्या जलद गाडीच्या कल्याणच्या दिशेकडील प्रथम वर्गाच्या डब्यातील महिला प्रवाशांनी सर्वप्रथम हा रांग लावण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला. कुठेही धक्काबुक्की न करता ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाप्रमाणे महिला रांग लावायला लागल्या आणि अर्धी भांडणे कमी झाली.
या महिलांच्या डब्याला लागून असलेल्याच प्रथम वर्गाच्या पुरुषांच्या डब्यात गाडी पकडताना गाडी प्लॅटफॉर्मला लागली की, डब्यात उडय़ा मारण्याचे प्रयत्न होत होते. त्यामुळे अनेकदा काही लोक पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्याचप्रमाणे कोणाचे पाकीट चोरीला जाणे, मोबाइल चोरीला जाणे, भांडणे होणे, या गोष्टीही सर्रास होत होत्या. त्यामुळे महिलांचा हा उपक्रम पाहून आम्हीही आमच्या डब्यापुरता हा उपक्रम सुरू करायचे ठरवले. त्यानुसार गेल्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी आम्ही पहिल्यांदा डब्याबाहेर रांग लावायला सुरुवात केली, असे या डब्यातील प्रवासी बी. एस. खरपुडे यांनी सांगितले.
सुरुवातीला या प्रकाराला आमच्याच सहप्रवाशांकडून विरोध झाला. हा मूर्खपणा आहे, बसायला जागा मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया सुरुवातीला होत्या. मात्र हळूहळू सर्वानाच रांगेचा फायदा जाणवायला लागला आणि त्यानंतर सर्वच जण मुकाटपणे रांगेत उभे राहायला लागले, असेही खरपुडे यांनी स्पष्ट केले. ही गाडी ठाण्याला येताना मुलुंडला थांबत नसल्याने ठाण्याला रिकामी होते. परिणामी पहिल्या ३८ जणांना बसायला जागा मिळते आणि इतरांना व्यवस्थित उभे राहता येते. तसेच रांग असल्याने एकाच गटातील दोघांनी इतरांच्या जागा पकडल्या आहेत, असे प्रकारही होत नाहीत, असे एका प्रवाशाने सांगितले. या डब्यातील प्रवासी विविध क्षेत्रांमधील आहेत. हा डबा आम्हाला जोडणारा समान धागा आहे आणि आता या रांगेच्या उपक्रमामुळे आम्ही आणखीनच जवळ आलो आहोत, असेही खरपुडे यांनी स्पष्ट केले. इतरांनीही यातून प्रेरणा घेतल्यास प्रवासातील निम्म्या कटकटी कमी होतील, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा