मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ताफ्यावर नगर येथे झालेल्या दगडफेकीचे पडसाद परभणीत उमटले. परभणीत राष्ट्रवादी भवनवर दगडफेक झाली, तर जिंतूर तालुक्यात तीन बसची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली. पाथरीत एस. टी. बसस्थानकातील केबिनची तोडफोड झाली, तर काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळण्यात आला. मनसे जिल्हाप्रमुख बालाजी मुंढे यांच्यासह १५-२० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तोडफोड प्रकरणी मात्र अटक कोणालाही करण्यात आली नाही.
बीडहून नगरला जाताना राज ठाकरे यांच्या ताफ्यावर रात्री दगडफेक झाल्याचे वृत्त पसरताच परभणीत मनसे कार्यकर्त्यांनी खानापूर फाटा येथील राष्ट्रवादी भवनवर दगडफेक केली. दगडफेकीत भवनाच्या दर्शनी भागावरील काच फुटली. दगडफेक करून कार्यकर्ते पसार झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून परभणीत राज ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिग्ज व बॅनर रातोरात काढून टाकले. रात्रीच मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. मध्यरात्रीनंतर नवा मोंढा पोलिसांनी राहुल कनकदंडे व इतर दोघांना ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी मनसेचे जिल्हाप्रमुख बालाजी मुंढे यांना गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे कृत्य मनसेकडून होणार नाही, असे लेखी दिल्यानंतर मुंढे यांना सोडून देण्यात आले.
जिंतूर तालुक्यात बसवर दगडफेक झाल्यानंतर जिल्ह्य़ातील सर्व बस त्या त्या ठिकाणी अकरानंतर आगारात थांबविण्यात आल्या. जवळपास ३ तास बस वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारनंतर लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्यात आल्या. जिंतूरमध्ये तीन बसची तोडफोड करून महामंडळाचे दोन लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. चारठाणा येथे सुरत-नांदेड (एमएच २० डीएल १७९६), औरंगाबाद-किनवट (एमएच २० १६४९) या दोन बसवर सकाळी नऊच्या सुमारास दगडफेक करण्यात आली, तर सकाळी पावणेसहाच्या सुमारास बोरगडवाडी मुक्कामी बस जिंतूरला येत असताना या बसच्या (एमएच २० डी ९८४५) काचा फोडल्या. या प्रकरणी १५जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पाथरी बसस्थानकात आगारप्रमुखांच्या केबिनची तोडफोड केली व तहसील कार्यालयासमोर पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सोनपेठमध्येही अजित पवारांचा पुतळा जाळण्यात आला. पूर्णा बाजार समितीत मनसे कार्यकर्ते जमले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी सभापती तथा मनसेचे कार्यकर्ते बालाजी देसाईसह प्रशांत कापसे, रुपेश सोनटक्के, ज्ञानोबा कदम, मुंजाभाऊ कदम आदी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी भवनवर झालेल्या दगडफेक प्रकरणात गोविंद गिरी यांच्या तक्रारीवरून सचिन पाटील, अमोल दैठणकरसह इतर कार्यकर्त्यांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, राष्ट्रवादी भवनाला पोलीस संरक्षण देण्यात आले.
मनसे-राष्ट्रवादीत जुंपली
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ताफ्यावर नगर येथे झालेल्या दगडफेकीचे पडसाद परभणीत उमटले. परभणीत राष्ट्रवादी भवनवर दगडफेक झाली, तर जिंतूर तालुक्यात तीन बसची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली.
First published on: 28-02-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qurreal in mns ncp