पतंग उडविण्याच्या कारणावरून संजयनगर भागातील दोन गटांत तुफान हाणामारी झाली, तर दुसऱ्या ठिकाणी शहरातील जिजामाता उद्यान परिसरातही अशीच मारामारी झाली. ऐन बाजाराच्या दिवशी या घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला, तर पोलिसांची पुरती दमछाक झाली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, तर अन्य फरारी झाले आहेत. या दोन्ही घटनेत जवळपास १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. संजयनगर भागात झालेल्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर जिजामाता उद्यान परिसरात झालेल्या मारामारीतील एकाला पाठलाग करून पकडले आहे. एकाचवेळी ऐन बाजार व मकरसंक्रांतीच्या दिवशी दोन ठिकाणी मारामाऱ्या झाल्याने व पोलिसांची झालेली धावपळ पाहून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात पोलीस निरीक्षक मधुकर औटे बैठकीनिमित्त नगरला गेले असल्याने जिजामाता परिसरात झालेल्या मारामारीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. संजयनगर भागात सोमवारी दुपारी २.३० च्या दरम्यान पतंग काटल्याच्या कारणावरून दोन गटात तूफान हाणामारी झाली. त्यात ४ ते ५ जण जखमीही झाले. या मारामारीत दगड-विटांचा मोठय़ा प्रमाणात मारा केल्याने संपूर्ण शहरात भीती पसरली होती. त्यातील आरोपी फकिरा रावसाहेब चंदनशिव, विजू आण्णा मरसाळे, लालू गणेश कुऱ्हाडे हे जखमी झाले, तर दत्तू भानदास कुऱ्हाडे, रवीचंद्रभान कुऱ्हाडे, सोमनाथ नाना थोरात, पिंटू सोळसे (सर्व राहणार संजयनगर) यांच्यापैकी पहिल्या तीन आरोपींना अटक केली.
पतंग उडवण्यावरून तुफान हाणामारी
पतंग उडविण्याच्या कारणावरून संजयनगर भागातील दोन गटांत तुफान हाणामारी झाली, तर दुसऱ्या ठिकाणी शहरातील जिजामाता उद्यान परिसरातही अशीच मारामारी झाली. ऐन बाजाराच्या दिवशी या घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला, तर पोलिसांची पुरती दमछाक झाली.
First published on: 15-01-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qurrel on kite flying arrest to four