एकिकडे जिल्हा शिवसेनेत नेहमीप्रमाणे ठराविक कालावधीनंतर उलथापालथ होत असताना शहर काँग्रेसमधील असंतोष पुन्हा उफाळून आला असून संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर त्यास व्यापक स्वरूप मिळण्याची चिन्हे असताना काँग्रेसचे नेते दिलीप वावरे यांच्या निधनामुळे असंतुष्टांना आपल्या भावनांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवावे लागले. असे असले तरी छाजेड गटाविरूध्द असंतुष्टांचा गट अधिकच आक्रमक झाला असून या पुढे कोणतेही कार्यक्रम काँग्रेस भवनात ‘समांतर काँग्रेस’ च्या वतीने घेण्यात येतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
आ. जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र आकाश यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यापासून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली. प्रारंभी माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांनी त्याविरूध्द उठाव केला. त्यानंतर काही काळ सर्वकाही शांत आहे, असे वातावरण तयार झाले. परंतु महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा छाजेड गटाविरूध्द हालचालींना पुन्हा वेग आला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंतुष्ट गटाची बैठकही झाली. संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर शहर काँग्रेस कार्यालयात तिळगूळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता होती. परंतु कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपर्यंत शहराध्यक्ष आकाश छाजेड कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यातच काँग्रेसचे नेते दिलीप वावरे यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकल्याने तिळगूळ वाटप कार्यक्रमच रद्द करण्यात आला. कार्यालयास कुलूप असल्याने उपस्थितांनी वावरे यांना आवारातच श्रध्दांजली अर्पण केली.
या वेळी डॉ. हेमलता पाटील यांनी आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला चांगली कामगिरी करणे अशक्य असल्याने मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. छाजेड गटाविरूध्द आम्ही ‘समांतर काँग्रेस’ तयार करणार आहोत. यापुढे असे कार्यक्रम काँग्रेस भवनात समांतर काँग्रेसच्या वतीने घेण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे छाजेड गटाविरूध्द सुरू असलेला उठाव यापुढे कोणते वळण घेतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे.