आर.आर. ऊर्फ आबांचे निधन होऊन एक दिवस लोटला तरी विदर्भातील अनेकांच्या आठवणींचा गहिवर काही थांबायला तयार नाही. अनेकदा मंत्रीपदाची झूल अंगावरून बाजूला सारत आबांनी लोकहित बघून घेतलेले निर्णय, सामाजिक संघटनांना केलेली मदत, समस्यांच्या सोडवणुकीसाठी दाखवलेली तत्परता याचीच चर्चा आज साश्रू नयनांनी ठिकठिकाणी होत राहिली.
लालदिव्याची गाडी हाताशी आली की, अनेकजण मंत्रीपदाचा तोरा मिरवतात. आबांनी तो कधी मिरवल्याचे दिसले नाही. ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यानंतर त्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियानाची चर्चा आता होत आहे. या अभियानाची प्रेरणा आबांनी तुकडोजी महाराजांच्या अनुयायांकडून घेतली. त्यासाठी ते खास तुकारामदादा गीताचार्याना भेटायला ब्रम्हपुरीजवळच्या अडय़ाळ टेकडीला आले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आबांच्या ग्रामस्वच्छता अभियानाने जन्म घेतला. समाज सुधारणेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची आबा स्वत:हून दखल घेत, संपर्क साधत. जमेल तशी मदत करत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील महिलांनी पाच वर्षांपूर्वी दारूबंदीसाठी हिवाळी अधिवेशनावर पदयात्रा काढली. हजारो स्त्रिया दोनशे किलोमीटर पायी चालत आल्या, हे ऐकून आबा कमालीचे अस्वस्थ झाले. ते केवळ या महिलांच्या पदयात्रेला सामोरे गेले नाही तर त्यांनी सर्व महिलांची नागपुरात राहण्याची सोय केली. प्रत्येकीला जेवण मिळेल, हे जातीने बघितले आणि सर्वात शेवटी या महिलांना परत जाता यावे म्हणून रेल्वेची तिकिटे काढून दिली. नंतरच्या प्रत्येक अधिवेशनात या महिलांच्या शिष्टमंडळाला घेऊन मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे आबा स्वत: फिरत राहिले. दारूबंदीला साखर कारखाने सांभाळणाऱ्या अनेक मंत्र्यांचा विरोध होता, पण आबा त्यांचा रोष पत्करून विदर्भातल्या या महिलांच्या बाजूने अखेपर्यंत राहिले. दुर्दैवाने त्यांच्या सरकारने न घेतलेला हा दारूबंदीचा निर्णय नव्या सरकारने घेतला तेव्हा मुंबईत उपचार घेत असलेले आबा बोलण्याच्या स्थितीतही नव्हते. नियतीचा खेळ किती क्रूर असतो, याचाच प्रत्यय या बंदी साजरी करणाऱ्या महिलांना आला.
नक्षलवादाच्या मुद्यावरून पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या आबांनी पूर्व विदर्भातील आदिवासींच्या हिताची सुद्धा काळजी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. गडचिरोलीचे केवळ पालकत्व घेऊन आबा थांबले नाही, तर तेथील गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पुण्यातील दीपक पायगुडेंच्या शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. हा सारा खर्च आबांनी उचलला. आजही शेकडो मुले पुण्यात केवळ त्यांच्यामुळे शिक्षण घेत आहेत. २००२ मध्ये पोलिसांनी चिन्ना मट्टामी या आदिवासी तरुणाला नक्षलवादी समजून ठार मारले. हे प्रकरण राज्यभरातल्या स्वयंसेवी संस्थांनी उचलून धरले. पुढे न्यायालयात लढा सुरू झाला. पोलीस आपली भूमिका सोडायला तयार नव्हते. चिन्नाच्या आईला दोन लाखाची भरपाई द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यावर पोलीस सर्वोच्च न्यायालयात गेले. आबांसारखा संवेदनशील माणूस गृहमंत्री असताना पोलीस असे कसे वागू शकतात, असा प्रश्न सर्वाना पडला. अखेर सामाजिक कार्यकर्त्यां पारोमिता गोस्वामींनी एक दिवस चिन्नाच्या आईला थेट आबांसमोर उभे केले. तिची कैफियत ऐकून संतापलेल्या आबांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. न्यायालयातून केस परत घ्यायला लावली व गडचिरोली जिल्ह्य़ातील सर्व पोलीस आपल्या एक दिवसाच्या वेतनातून दोन लाख रुपये गोळा करून चिन्नाच्या आईला देतील, असे फर्मावले. त्यानुसार चिन्नाच्या आईला मदत मिळाली व एका लढय़ाची यशस्वी सांगता झाली.
केवळ चिन्नाच नाही, तर अशा कितीतरी प्रकरणात आबांनी मंत्रीपदाची झूल बाजूला सारून लोकहितासाठी अनेक निर्णय घेतले. नक्षलवादविरोधी अभियान राबवणारे जवान अनेकदा गावातील आदिवासींना मारहाण करतात. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळते, हे लक्षात आल्यावर अजिबात मारहाण करायची नाही, असा आदेशच आबांनी देऊन टाकला. गडचिरोलीत आले की, आबा केवळ अधिकाऱ्यांशी बोलायचे नाहीत तर शोधमोहीम राबवणाऱ्या जवानांचा ‘दरबार’ भरवायचे. त्यावेळी अधिकाऱ्यांना बाहेर काढले जायचे. तुमच्या समस्या थेट मला सांगा, असे ते सांगायचे. यामुळे जवानांचा हुरूप वाढला. एखाद्याशी स्नेह जडला की, त्याच्या बऱ्या वाईटाच्या काळात तत्परतेने मदत करायची, हा आबांचा स्वभाव होता. ग्रामस्वच्छता अभियानाची संकल्पना अंमलात आणण्यास मदत करणारे तुकारामदादा गीताचार्य यांचे पुण्यात निधन झाले, हे कळताच आबांनी त्यांचे पार्थिव विदर्भात सुस्थितीत कसे पोहोचेल, यासाठी प्रचंड धावपळ केली. अण्णा हजारे तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या सुरेशदादा जैन यांच्या विरोधात मुंबईत उपोषणाला बसले होते तेव्हा अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी आबांनी तुकारामदादांकडून मध्यस्थी करवली होती. त्यात यश आले नाही, पण आबांच्या स्नेहापोटी त्यांना अडचणीच्या काळात मदत करणारे तुकारामदादा तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते. हाती घेतलेले काम मनापासून करायचे, ते करताना कोणताही बडेजाव मिरवायचा नाही, या आबांच्या वृत्तीमुळे पोलीस दलातही त्यांच्या शब्दाला प्रचंड मान होता.
आता त्यांच्या निधनानंतर फक्त हळहळ तेवढी उरली आहे. आबांच्या अकाली जाण्याने सारे शोकसागरात बुडालेले असताना नक्षलवाद्यांच्या वर्तुळातून मात्र ‘मनुवादी आबांना’ श्रद्धांजली, असे संदेश फिरू लागले आहेत. पुरोगामी आबांना मनुवादी ठरवणारे नक्षलवादी हे देशाचे शत्रूच आहेत, हेच या संदेशाने स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा