समाजातील भांडणे, हेवेदावे, तक्रारी यांचा निपटारा करणाऱ्या पोलीस ठाण्यांना कधी कधी स्वत:चे प्रतिवाद सोडवावे लागत असल्याचे नवी मुंबईतील दोन पोलीस ठाण्यांच्या सरहद्द वाटपावरून दिसून येत आहे. नवी मुंबईतील सर्वात जुने पोलीस ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रबाले पोलीस ठाण्याचे लोकसभा निवडणुकीनंतर एमआयडीसी क्षेत्रातून नागरी वसाहतीत स्थलांतर होणार असून रबाले पोलिसांनी आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.
औद्योगिक वसाहतीत वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी गृहविभागाच्या संमतीने नवी मुबंई पोलीस आयुक्तालयाने एक वर्षांपूर्वी रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे निर्माण केले आहे. या पोलीस ठाण्याच्या कामकाजासाठी त्यांच्याच क्षेत्रात असणाऱ्या रबाले पोलीस ठाण्याच्या संपूर्ण वास्तूचा ताबा मागितला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही हस्तांतर आणि स्थलांतर प्रक्रिया सुरू होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीपूर्वी ८० च्या दशकात रबाले व तुर्भे पोलीस ठाण्यांची निर्मिती झालेली आहे.
ही दोन्ही पोलीस ठाणी त्यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येत होती. त्यानंतर सप्टेंबर ९४ रोजी नवी मुंबईसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात असणारी नवी मुंबईतील ही पोलीस ठाणी आपोआप हस्तांतरित झाली. त्यातील रबाले पोलीस ठाण्याला आता पुन्हा स्थलांतरित व्हावे लागणार आहे.
ठाणे बेलापूर मार्गावर रबाले एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या ह्य़ा पोलीस ठाण्याचा दिघ्यापासून घणसोलीपर्यंत विस्तार आहे. नवी मुंबईतील विस्ताराने सर्वात मोठे आणि संवेदनशील असणाऱ्या या पोलीस ठाण्याची विभाजन करण्यात यावे अशी अनेक वर्षांची मागणी होती. गतवर्षी रबाले एमआयडीसीच्या नावाने यातील एमआयडीसी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यात आले.
एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर अल्फा लेवल कंपनीच्या समोर सुरू करण्यात आलेल्या या पोलीस ठाण्याला जागेची मोठी अडचण गेली अनेक दिवस भेडसावत होती. सुमारे ७० पोलीस अधिकारी कर्मचारी असणाऱ्या या पोलीस ठाण्यात कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने या पोलीस ठाण्याने इतरत्र जागा शोधण्याच्या फंदात न पडता थेट रबाले पोलीस ठाण्याच्या जागेवरच दावा ठोकला. रबाले पोलीस ठाणे आमच्या हद्दीत असल्याने ही जागा आमच्या पोलीस ठाण्याला मिळावी यासाठी असा तगादा येथील पोलिसांनी आयुक्ताकडे लावला.
कार्यक्षेत्रानुसार हा दावा रास्त असल्याने मुख्यालयाने रबाले पोलीस ठाण्याला दुसरी जागा बघण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार त्यांनी तळवली गावाजवळील एका पोलीस चौकीच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर रबाले पोलीस ठाण्याचा कारभार तळवली येथून चालणार आहे. नागरी वसाहतीसाठी असणाऱ्या या पोलीस ठाण्याचे नामकरणदेखील होण्याची शक्यता असून ऐरोलीचा जास्त भाग असल्याने ऐरोली पोलीस ठाणे असे नामकरण होण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यासाठी ऐरोली सेक्टर ८ मध्ये जागा राखीव आहे, पण ती सिडकोने अद्याप ताब्यात दिलेली नाही.
रबाले पोलीस ठाण्याला असलेले बकाल रूप अलीकडे चांगलेच सुधारण्यात आले असून ४० वर्षांपूर्वीची जुनी झाडे या परिसरात आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याची जागा हवेशीर आणि प्रशस्त मानली जात आहे. त्यामुळेच एमआयडीसी पोलिसांचा डोळा या ठाण्यावर आहे.
तळवली येथील जागा कमी असल्याने पोलीस ठाण्याचे सर्वच विभाग स्थलांतरित होतील असे नाही. त्यामुळे काही विभाग रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत राहतील असे दिसून येते. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याला आयती एका पोलीस ठाण्याची जागा मिळणार आहे. यामुळे ऐरोलीकरांना रेल्वे रुळ तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक ओलांडून तक्रार देण्याचा त्रास यापुढे वाचणार आहे.

Story img Loader