अधिकारी सुटीवर, पदाधिकारी सहलीवर, कार्यालय वाऱ्यावर
येत्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मोच्रेबांधणीला सुरुवात झाली असून सत्तेत बहुमत असलेले भाजपचे पदाधिकारी सहलीवर गेले आहेत, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालय विनासरदाराचे ठरत आहे. गेल्या ५ दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयाचा कारभार वाऱ्यावर चालत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना नव्या सीईओ व अध्यक्ष, उपाध्यक्षांचे वेध लागले आहेत.
येत्या १५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचा चालू पंचवार्षकि कार्यकाळाचा अडिच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. १६ जानेवारी रोजी पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. असे असले तरी निर्माण झालेल्या गटबाजीला कसल्याही प्रकारचे खतपाणी मिळू नये, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या भाजप पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून सहलीवर नेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे एकूण २९ पदाधिकाऱ्यांपंकी २८ पदाधिकारी सहलीवर गेले आहेत, तर एकमेव महिला पदाधिकारी काही कारणास्तव सहलीवर गेली नाही, परंतु जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या मोच्रेबांधणीमुळे १६ जानेवारीपर्यंत काही उलटफेर तर होणार नाही, अशीही चर्चा सुरू आहे. चार दिवसांपासून सत्ताधारी बाकाचे सदस्य सहलीवर गेल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या कक्षात शुकशुकाट पसरला आहे.
दुसरीकडे अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे कार्यालयातील त्यांच्या कक्षात आधीपासूनच शुकशुकाट आहे. एकंदरीत अधिकारी व पदाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या ३ दिवसांपासून गोंदिया जिल्हा परिषदेचे कामकाज म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीचा कारभार झाला आहे. जिल्हा परिषद कार्यालय वाऱ्यावर सुरू आहे. कार्यालयातील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे टेबल फाईलपुरतेच दिसून येत आहेत. काही कर्मचारी पानटपऱ्यांवर, तर काही मौजमस्तीत मग्न आहेत. असा कारभार १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असेल तर नागरिकांच्या कामांचे काय होणार , असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader