हापूस आंबा आवडत नाही, असा माणूस सापडेल का? मोहम्मद रफी यांच्या आवाजाच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. मधाळ आणि पहाडी आवाजाच्या या गायकाचे नाव हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासाच्या पानोपानी कोरलेले आहे. संगीताचा प्रवाह, संदर्भ बदलत असतानाही या ‘फेसबुक युगा’त त्यांची रसिकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. असा गायक पुन्हा होणे नाही, अशीच त्यांच्या चाहत्यांची भावना. मात्र त्यांचे काही गायक-चाहते त्यांच्या आवाजाची शैली जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून श्रीकांत नारायण याच्यासारखा गुणी गायक निर्माण होतो. गेली दोन दशके रफीगीते गाणारा हा गायक आता एका वेगळ्या विक्रमासाठी तयार झाला आहे. आपल्या दैवताची गाणी सलग १२ तास गाण्याचा संकल्प त्याने सोडला असून येत्या २५ डिसेंबरला मुंबईत तो हा जाहीर प्रयत्न करणार आहे.
२४ डिसेंबर हा रफींचा जन्मदिन. त्यांच्या ८८व्या जन्मदिनाचे औचित्य साधत आमदार आशीष शेलार यांच्या स्पंदन आर्ट्स या संस्थेने ‘पुकारता चला हू मै’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’ या संस्थेची ही निर्मिती असून २५ डिसेंबर या दिवशी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात श्रीकांत सलग १२ तास रफींची गाणी गाणार आहे. सरिता राजेश आणि मोना कामत या सहगायिका त्याला यात साथ देणार आहेत. याच कार्यक्रमात ‘मोहम्मद रफी अॅवॉर्ड’चे वितरण होणार असून प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी आणि संगीतकार नौशाद (मरणोत्तर) यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
सलग १२ तास गाणी गाणं, तीही रफींची ही गोष्ट काहीशी अविश्वसनीय वाटल्याने त्याच्या शक्यतेबाबत श्रीकांतलाच बोलतं केलं. ‘‘हा संकल्प खूप कठीण आहे, याची मला जाणीव आहे, मात्र चाहत्यांचे प्रेम आणि रफीसाहेबांचा आशीर्वाद या जोरावर मी ते निभावून नेईन, असा मला विश्वास आहे,’’ असे तो म्हणाला. ‘‘गेली अनेक वर्षे मी रफीसाहेबांची गाणी गातोय, प्रत्येक कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्याने त्यांची सर्व गाणी गाता येत नाहीत आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे चाहते मला गाठून ‘तुम्ही अमुक गाणं म्हटलं नाही, तमुक गाणं घ्यायला हवं होतं’ अशी प्रेमळ दटावणी करतात. मात्र या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या पाठिंब्यामुळे मला ही संधी मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत अथवा कोठेही रफीसाहेबांची गाणी सलग १२ तास गाण्याचा प्रयत्न आजवर कोणी केलेला नाही. हा संकल्प यशस्वी झाला तर मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजेन,’’ अशी भावना त्याने व्यक्त केली. यात कोणती गाणी गाणार, ब्रेक किती घेणार, वगैरे शंकांना उत्तर देताना त्याने सांगितले की, ‘‘यात आम्ही प्रत्येकी २५ गाण्यांची चार सत्रे केली आहेत, अखेरच्या सत्रात त्यात आणखी एक म्हणजे २६ गाणी असतील, या प्रमाणे एकूण १०१ गाणी गाण्याचा माझा प्रयत्न आहे, त्यात तब्बल ७० सोलो गीते, तर उर्वरित युगुलगीते असतील. रफीसाहेबांनी अनेक प्रकारची गाणी गायली, त्या प्रत्येक प्रकाराचा नमुना मी सादर करणार आहे. प्रथितयश संगीतकारांच्या गाण्यांसह इक्बाल कुरेशी, गुलाम मोहम्मद, श्याम-घनश्याम, सोनिक-ओमी आदी उपेक्षित संगीतकारांची गाणीही यात आहेत. आजवर देश-विदेशात मी सुमारे एक हजार कार्यक्रम केले आहेत, मात्र हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम ठरेल, यात बिलकूल शंका नाही.   
..आणि सूर गवसला!
भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना एका स्पर्धेत मी रफीसाहेबांचं ‘तेरे मेरे सपने’ हे गाणं गायलं आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. तुझा आवाज रफींशी मिळताजुळता आहे, असं मित्र नेहमी सांगायचे, मात्र मी ते गांभीर्याने घ्यायचो नाही. या स्पर्धेनंतर मात्र मी रफीसाहेबांची गाणी लक्षपूर्वक ऐकू लागलो. त्यानंतर या दैवी आवाजाने मला अक्षरश: झपाटलं. अर्थात, मी त्यांच्या आवाजाची कधीही जाणीवपूर्वक नक्कल केली नाही.
माझ्या आवाजात रसिकांना जर रफीसाहेबांच्या आवाजाचा भास होत असेल तर तो केवळ त्या महागायकाचा आशीर्वाद आहे, असं मी मानतो. त्यांचा आवाज तर लाखो-करोडोंत एक होता, त्या आवाजाचं वर्णन करणं अशक्य आहे. त्यांची गाणी गायल्याने मला ओ. पी. नय्यर, नौशाद, प्यारेलाल, खय्याम, आशा भोसले, देव आनंद अशा दिग्गजांचा सहवास व प्रेम लाभलं. त्यांच्या महानतेला धक्का न लावता मनापासून त्यांची गाणी गाणं एवढंच मला ठाऊक आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा