चिखली विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा दणदणीत पराभव करून भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा दृढसंकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. कॉंग्रेसविरोधात येथे असलेले वातावरण, तसेच संघटन कौशल्याच्या जोरावर या मतदार संघात पक्ष सत्तेवर येणे सहज शक्य आहे. येथील निष्क्रीय ठरलेल्या राहुलची कॉंग्रेस हद्द्पार करा, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ नेते अ‍ॅड.विजयकुमार कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त विजय संकल्प दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे सर्व जुने नवे कार्यकर्ते एकत्र आले होते. या निमित्त्याने पक्षाच्या आधुनिक संपर्क कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब लाहोटी होते. यावेळी अ‍ॅड.विजयकुमार कोठारी, जिल्हा सरचिटणीस सुरेशआप्पा खबुतरे, रामदास आंबटकर, जि.प.सदस्य श्याम पठाडे, आकाश फुंडकर, शिवराज जाधव, नरेंद्र अग्रवाल, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शकुंतला बाहेकर, प्रकाशबुवा जवंजाळ, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, अ‍ॅड.मंगेश व्यवहारे, देविदास जाधव, श्रीराम सपकाळ, संजय महाले, इम्रान शेख, सुहास शेटे, अमोल खबुतरे, अमोल साठे, अ.मोबीन, गोपाल देव्हडे, शेख करामत, नंदू खंडेलवाल, विष्णू जोगदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अ‍ॅड.विजयकुमार कोठारी म्हणाले की, भाजपाच्या विचारात आपण लहानाचे मोठे झालो त्याच विचाराचा प्रसार व प्रचारासाठी आपल्या हातून कार्यालयाची स्थापना झाल्याचा क्षण आनंददायी व समाधानाचा आहे. भाजपा कार्यालयाचा पदाधिकारी व जनतेने भरपूर उपयोग करून घेत आपल्या समस्या सोडविण्याचे आधार केंद्र म्हणून कार्यालयाकडे धाव घ्यावी.
भाजपा पश्चिम विदर्भप्रमुख रामदास आंबटकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भाने भाजपाचे विदर्भातील हे पहिले सुसज्ज कार्यालय असल्याचे नमूद केले.
यावेळी गोविंदराव शेटे, जयवंतराव शेटे, बापुसाहेब डाळीमकर, बाबुराव राजे, छबुकाका शेटे, केशवराव गुरूदासाणी, भाऊसाहेब लाहोटी, राजाभाऊ खरात यांचा जिल्हाध्यक्ष आमदार संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नगरसेवक पंडितराव देशमुख, संचालन शहराध्यक्ष आनंदराव हिवाळे, तर आभार नारायण खरात यांनी मानले. कॉंग्रेसचे आमदार व भावी उमेदवार राहुल बोंद्रे यांचा कुठल्याही परिस्थितीत पराभव करण्याचा संकल्प भाजपाच्यावतीने यावेळी करण्यात आला.
उमेदवार कोणीही असला तरी पक्षाचा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अ‍ॅड.कोठारी यावेळी म्हणाले.