दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होईल तेवढे चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी केलेले प्रयत्नही ‘डिसेंट’ श्रेणीतील असल्याचे प्रशस्तिपत्र काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी दिले. निधोना येथे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामाची पाहणी केल्यानंतर मजुरांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त भागात आपण स्वत: येऊन पाहणी करू, असे सांगत होतो. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आलो. काही चांगल्या योजना सुरू असून त्याचा सामान्यांना फायदा होत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, महसूल तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.
राहुल गांधी यांनी सकाळी पिंपळगाव येथे भेट दिली. तेथे गावकऱ्यांनी पाण्याची समस्या किती गंभीर आहे, हे सांगितले. गाऱ्हाणी एवढी होती, की जिल्हाधिकाऱ्यांना व स्वत: मुख्यमंत्र्यांनाही काय व्यवस्था करण्यात आली, याचा खुलासा करावा लागला. त्यानंतर निधोना गावी एका शाळकरी मुलाशी राहुल गांधींनी गप्पा मारल्या. हा मुलगा काय बोलला, हे नंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्या मुलाला सैन्यात भरती व्हायची इच्छा आहे. त्याला प्रश्न विचारला, ‘का रे, तुला बंदूक हातात घ्यावी, असे का वाटते? मुलाने उत्तर दिले नाही. तो तसाच शांत राहिला,’ असे राहुल गांधी यांनी या भेटीबाबत सांगितले.
बाबरा येथे शेततळय़ाची पाहणी केल्यानंतर येथील चारा छावणीलाही भेट दिली. या वेळी गावकऱ्यांनी अडचणी सांगाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. गावकऱ्यांनी मध्यम प्रकल्पातील अडथळे आणि न झालेले रस्त्याचे काम त्यांच्यासमोर मांडले. गावकऱ्यांनी अडचण मांडली, की त्याचे उत्तर मात्र मुख्यमंत्री चव्हाण देत होते. वाकोद-गिरिजा प्रकल्पासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद त्यांनी जाहीर केली. तसेच १२ किलोमीटरचा रस्ताही पूर्ण केला जाईल, असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा