आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करावी, यासाठी पक्षाचे नगरमधील कार्यकर्ते, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आग्रह धरणार आहेत. तशा मागणीचे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदनही सोनिया गांधी यांना दिले जाणार आहे.
पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा व शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक शुक्रवारी (दि. १७) दिल्लीतील तालकटोरा संकुलात होणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सारडा यांना दिले आहे. या बैठकीत नगरच्या कार्यकर्त्यांच्या मागणीचे निवेदन सोनिया गांधी यांना दिले जाणार असल्याचे सारडा यांनी सांगितले.
काँग्रेसने संघटनात्मक व धोरणात्मक सुधारणांबाबत काय उपाययोजना राबवल्या पाहिजेत, यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून, त्यांच्या मताचे पत्रही दिल्लीतील बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सारडा यांच्यामार्फत दिले जाणार आहे.

Story img Loader