मुळा नदीपात्रात बेकायदेशीररीत्या उत्खनन करणारा जेसीबी व दोन बोटी तहसीलदार जयसिंग वळवी यांनी सोमवारी रात्री अकराच्या सुमारास पकडल्या. बोटींसह सीबी ताब्यात घेण्यात आला असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वळवी यांनी सांगितले. दरम्यान, तहसिलदारांच्या कारवाईनंतर तालुक्यातील काही वाळूतस्करांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
तालुक्यातील अनेक वाळूतस्कर मुळा नदीपात्रात ठिकठिकाणी यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर वाळूउपसा करीत आहेत. त्याची कुणकूण महसूल यंत्रणेला लागल्यानंतर तहसीलदार वळवी यांनी सोमवारी रात्री तास, भुलदरा येथे छापा टाकून एक जेसीबी व दोन बोटी ताब्यात घेतल्या. पथक तेथे गेल्यानंतर तेथील लोकांनी तेथून पळ काढला. त्यामुळे तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांना रात्र नदीतच जागून काढावी लागली. मंगळवारी दिवसभर हे पथक तासमध्येच होते. तरीही जेसीबी तसेच बोटींचे मालक तेथे न फिरकल्याने अखेर खाजगी चालकाच्या मदतीने जेसीबी पारनेर तहसील कार्यालयाकडे आणण्यात आला तर स्वतंत्र वाहनातून बोटीही तहसील कार्यालयात आणण्यात आल्या.
तास येथे जेसीबी व बोटी जप्त करण्यात आल्या असल्या तरी तेथे करण्यात आलेल्या उत्खननाचे मोजमाप करून त्यावरही दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader