उमरी येथील जुगार अड्डय़ावर छापा घालून सहायक पोलीस अधीक्षक अमोध गावकर यांच्या पथकाने माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार याच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये १ पोलीस, दोन शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिसांचेच या जुगार अड्डय़ाला संरक्षण होते, अशी चर्चा आहे.
उमरीचे माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार यांच्या मालकीचे भरवस्तीत साई शगून हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उघडपणे पत्त्यांचा क्लब सुरू होता. उमरी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या ‘अर्थ’पूर्ण मूकसंमतीनंतर चालणाऱ्या या जुगार अड्डय़ाची कुणकुण लागल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अमोघ गावकर यांच्या पथकाने छापा मारला. पसे लावून पत्ते खेळणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल धनराज काळे, जिल्हा परिषदेचा शिक्षक दिगंबर नागलवाड, भगवान खांडरे, माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार, विठ्ठल होनशेट्टे, रतन कंधारे, गणेश मुपडे, बालाजी पुपुलवाड, विलास भेरजे व पांडु हेनगे या ११ जणांना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्या जवळील रोख रक्कम ८० हजार, मोबाइल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईने उमरीमध्ये खळबळ उडाली होती. आरोपींविरुद्ध कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आला. परंतु सहायक पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा