राज्य सरकारने गुटखा बंदी लागू केली असतानाही चोरून विकणा-या व शहरातील इतरांना माल पुरवणा-या लालचंद स्वरूपचंद चोपडा (वय ५५) या व्यापा-याच्या दुकानावर नगर येथील अन्नभेसळ पथकाने छापा घालून २९ हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला. या व्यापा-याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून त्याला अटक करण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानकाजवळील गाळ्यांमध्ये राजेश ट्रेडर्स या दुकानामध्ये चोरून गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्नभेसळ खात्याला मिळाली होती. त्यानुसार काल दुपारी या पथकाने राजेश ट्रेडर्स छापा घातला असता दुकानात अनेक कंपन्यांचे गुटख्याचे पुडे आढळून आले. या वेळी दुकानात लालचंद चोपडा हे उपस्थित होते.
अन्नभेसळ पथकातील अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार, के. एच. बावीस्कर, नमुना सहायक ना. का. ढगे यांनी दुकानाची झडती घेतली असता त्यांना आर. आर. गुटका ९६० पाऊच, गोवा १ हजार ९२० पाऊच, हिरा १ हजार ८७५ पाऊच, विमल ३०० पाऊच, नजर ९ हजार ६०० पाऊच, पानपराग ८०० पाऊच, हिरा पानपराग ३७५ पाऊच असे १३ हजार २५५ पाऊच आढळून आले. या मालाची किंमत सुमारे २८ हजार १६७ रुपये आहे.
या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी लालचंद चोपडा यांच्या विरुद्ध फिर्यादी दिली असून पोलिसांनी अन्नभेसळ व भारतील दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरचा व्यापारी हा गेल्या अनेक दिवसांपासून चोरून गुटख्याची विक्री करीत होता. त्यामुळे शहरामध्ये बंदी असूनही खुले आम गुटखा तिप्पट दराने मिळत होता. पोलिसांनी या व्यापा-याला अटक करण्याची तयारी सुरू केली असून संध्याकाळपर्यंत त्याला अटक झालेली नव्हती.
श्रीरामपूरच्या गुटखा व्यापा-यावर छापा
राज्य सरकारने गुटखा बंदी लागू केली असतानाही चोरून विकणा-या व शहरातील इतरांना माल पुरवणा-या लालचंद स्वरूपचंद चोपडा (वय ५५) या व्यापा-याच्या दुकानावर नगर येथील अन्नभेसळ पथकाने छापा घालून २९ हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला.
आणखी वाचा
First published on: 11-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid on gutka trader in shrirampur