क्लब असल्याचा दावा करत बंदच्या दिवशी ग्राहकांना देशी-विदेशी दारू उपलब्ध करून देणाऱ्या बायपास मार्गावरील जयश्रीया क्लबवर छापा टाकून पोलिसांनी ३५ मद्यपींवर कारवाई केली. यात गर्भश्रीमंत ग्राहकांसह क्लब व्यवस्थापक व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर क्लबचे मालक अमोल निरंजनसिंह चव्हाण फरार झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त १४ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हाभरात दारूविक्री बंद होती, मात्र बंदच्या काळातही क्लबच्या नावावर येथील जयश्रीया क्लबमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू होती. याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रात्री अकरा वाजताच्या सुमारास क्लबवर छापा टाकला असता ग्राहकांना खुलेआम दारू उपलब्ध करून देण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी क्लबमध्ये बसून मद्यप्राशन करणाऱ्या ३५ गर्भश्रीमंत मद्यपींवर कारवाई केली.
तसेच क्लबचे व्यवस्थापक गजेंद्र प्रतापसिंग राठोड, बाबू गोसावी, राहुल खरे यांनाही अटक केली. छाप्याच्या वेळी घटनास्थळाहून १ लाख ६ हजार ९६० रुपयांचा नगदी माल, ५८ हजार १७० रुपयांची विदेशी दारू, ४८ हजार ७९० रुपयांची बीअर, असा एकूण २ लाख १३ हजार ९२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या छाप्याची माहिती मिळताच क्लबचे संचालक अमोल निरंजनसिंह चव्हाण फरार झाले. यातील सर्व मद्यपींवर कारवाई करण्यात आली असून पोलीस फरार आरोपी अमोल चव्हाण यांचा शोध घेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा