एकदा विकलेल्या जमिनीवर पुन्हा भूखंड विकून सुमारे दीड हजार भूखंड धारकांची सुमारे साठ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी एका विकासकाविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले आणि शहरातील तीन ठिकाणी मंगळवारी दुपारी छापे घातले.
सुरेश बुरेवार हे आरोपीचे नाव असून त्यांचा गृहलक्ष्मी डेव्हलपर्स नावाचा व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊ दिवंगत संतोष बुरेवार यांनी पवनसूत रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स नावाने जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरेश हे त्यात भागीदार होते. त्यांनी खापरी डव्हा येथील खसरा क्रमांक ७१ व ७२वरील खरेदी केलेली दहा एकर जमीन २००५ मध्ये विकली होती. तत्पूर्वी २००४ मध्ये आरोपी सुरेश बुरेवार यांना त्या जमिनीसाठी आम मुखत्यार पत्र तयार करून दिले होते. त्याआधारे ही जमीन १९९० ते १९९२ दरम्यान पुन्हा दोघांना विकण्यात आली. त्यानंतर संतोष बुरेवार यांचे निधन झाले. नंतर आरोपी सुरेश बुरेवार यांनी गृहलक्ष्मी डेव्हलपर्सच्या नावाने स्वतंत्र व्यवसाय सुरू केला व त्यामार्फत २००८ मध्ये भूखंड पाडले. त्यासंबंधी इसारापत्र व नकाशा तयार करून एक ते दीड हजार लोकांना विकले. त्यासाठी हप्त्याहप्त्याने रक्कम घेतली.
फिर्यादी विजेंद्र अशोक गोजे (रा. महाल) यांनीही हप्त्याहप्त्याने तीन वर्षे ५० हजार ९५० रुपये सुरेश बुरेवार यांना दिले. इसारापत्र व नकाशा दिला असला तरी त्यांनी विक्री पत्र करून दिले नाही. ‘विक्रीपत्र करून द्या, अन्यथा रक्कम परत द्या’, असा तगादा भूखंडधारकांनी लावला. सुरेश बुरेवार त्यांना टाळत असल्याने या भूखंडधारकांना शंका आली. ज्या जमिनीवर भूखंड पाडले ती जमीन याआधी दोनवेळा विकण्यात आल्याचे त्यांना समजले. विजेंद्र यांनी याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सह पोलीस आयुक्त संजय सक्सेना, गुन्हे शाखेचे प्रमुख उपायुक्त सुनील कोल्हे यांनी बारकाईने तपास करून कारवाईचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले.
फिर्यादीची ५० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे तसेच या जमिनीवर भूखंड पाडून दीड हजार लोकांकडून सुमारे साठ लाख रुपये आरोपी सुरेश बुरेवार यांनी घेतल्याचे पोलीस निरीक्षक विष्णू भोई यांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाले.
आज आरोपी सुरेश बुरेवार यांच्याविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर छत्रपती नगर चौकातल्या प्रिंस कॉम्प्लेक्सच्या चवथ्या मजल्यावर असलेल्या पवनसूत रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्सचे कार्यालय, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील गृहलक्ष्मी डेव्हलपर्सचे कार्यालय तसेच आरोपी सुरेश बुरेवार यांच्या मनीषनगरातील घरी एकाचवेळी छापे घालण्यात आले. त्यामुळे या परिसरात तसेच रिअल इस्टेट वर्तुळात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
या कारवाईत बँक खाती, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक, जमिनी व त्यांचे खरेदी-विक्री व्यवहार, पावती पुस्तके, लेखा पुस्तके आदी अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. कार्यालयांमधील संगणकामधील नोंदी तपासण्यात आल्या. आरोपी संतोष बुरेवार रोजच या कार्यालयात यायचे. मात्र, आजच ते आले नाही. पोलिसांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, मात्र तो बंद होता. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा