आमावास्येचा कीर्र अंधार, अंगाला झोंबणारा सुसाट वारा, आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्या, शांतपणे झोपी गेलेला किल्ले रायगड, सौर ऊर्जेचा एखादा चमकणारा दिवा, त्यात मध्येच दिसणारा बॅटऱ्यांचा प्रकाश, मातीला येणारा सुगंध, हुडहुडी भरविणारी थंडी अशा प्रसन्न, शांत, वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शे-दोनशे आबालवृद्ध शिवप्रेमींनी घरची दिवाळी सोडून रविवारी पहाटे रायगडावर दिवाळी पहाट साजरी केली. संपूर्ण देशात दिवाळीला आपल्या घरी दिव्यांची आरस केली जात असताना आपले गड-किल्ले अंधारात राहतात हे योग्य नसून तेसुद्धा दिव्यांनी उजळावेत, या एकाच हेतूने काही शिवप्रेमींनी रायगडावर ही प्रथा सुरू केली आहे.
रायगड म्हणजे शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींची मर्मबंधातली ठेवच जणू! रायगडावरील अष्टप्रधान मंडळाच्या कचेऱ्या, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, राणी महाल, राजदरबार, होळीचा माळ.. सारीच अंगावर रोमांच उभे करणारी ऐतिहासिक ठिकाणे. त्यामुळेच संपूर्ण देशात दिवाळीचा उल्हास आणि उत्साह असताना रायगडावर मात्र मिट्ट काळोख असणे योग्य नाही हा विचार अनेक शिवप्रेमींना अस्वस्थ करीत होता. त्यातूनच दोन वर्षांपासून रायगडावर दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. त्यात सोशल मीडियाचा मोठा हातभार लागला असून दुर्ग संवर्धन, किल्ले जागृती, किल्ले संपत्ती, शिव प्रतिष्ठान, मराठा ब्रिगेड आदी संस्थांनी पुढाकार घेतला आणि दिवाळीत रायगड सहस्र दिव्यांनी उजळून निघू लागला.
अभिजित पवार, निखिल साळसकर, सागर काणे, अमोल तावरे, सुहास बडेंबे या तरुणांबरोबरच ८३ वर्षीय साताऱ्याचे जगताप काका, दत्तात्रय तावरे, महादेव गावडे या तरुण तुर्काची हजेरी लक्षवेधी होती. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे पणतीची ज्योत तेवत राहणे तसे कठीणच. तरी मशालींच्या सहाय्याने या पणत्या पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. १२०० पणत्यांची आरास गडावरील मोक्याच्या ठिकाणी केली गेली. जेथे पणत्या पेटणे शक्य नाही, तेथे मग मशालींना पणत्यांचे स्वरूप देण्यात आले. पहाटे चार वाजता प्रथम जगदीश्वराच्या मंदिरात पणत्यांची आरास करण्यात आली. शंभू महादेवाला साकडे घालण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या समाधीजवळ पणत्या लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण वाऱ्यामुळे त्या पेटेनात तेव्हा हिरोजी इंदुलकरांच्या पायरीजवळ पणती लावण्यात आली. गडदेवता शिरकाई मातेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर शिवप्रेमींनी राजदरबारात मशालींचा जागर केला. महिलांचाही बऱ्यापैकी समावेश असणाऱ्या या दरबारात मशालींच्या लख्ख प्रकाशात महाराजांचे सिंहासन काही काळ उजळून गेले होते. छत्रपती महाराजांच्या जयजयकाराने दरबार दुमदुमून गेला. होळीच्या माळावरील मेघडंबरी शिवपुतळ्याजवळ दीपोत्सव साजरा करून पहाटे सहा वाजता हा उत्सव संपला. तोपर्यंत आकाशात सूर्यदेव अवतरला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी काही क्षणातच मग सूर्यदेवाची स्वारीही जातीने हजर झाली!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा