विक्रेते तसेच फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी हप्तेबाजी करणाऱ्या रेल्वे पोलिसांकडून अशाच एका विक्रेत्याला थेट गाडीतून फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, आता अशा पोलिसांविरुद्ध माहिती गोळा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मुंबईत पहिल्यांदाच आलेल्या नवख्या प्रवाशांकडूनही रेल्वे पोलीस पैसे उकळतात, अशा तक्रारीही मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्या आहेत. अशा प्रकारे सतावणूक करणाऱ्या पोलिसांविरुद्ध थेट तक्रारी करा, असे आवाहन आयुक्तांकडूनच करण्यात आले आहे.
रेल्वेतील विक्रेते तसेच पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांकडून हप्ता उकळणारी पोलिसांची टोळी रेल्वेत आहे. याविरुद्ध वेळोवेळी तक्रारी झाल्या, बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याचे फक्त नाटक केले. प्रत्यक्षात रेल्वे पोलिसांची दादागिरी सुरूच राहिली. अलीकडेच एका फेरीवाल्याने हप्ता दिला नाही म्हणून त्याला थेट चालत्या गाडीतून खाली फेकण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली. याप्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आले असले, तरी असे अनेक पोलीस अद्यापही एकाच जागी ठाण मांडून आहेत. या पोलिसांच्या रेल्वेअंतर्गतच बदल्या होत असल्यामुळे कारवाई झाली तरी ‘वजन’ वापरून पुन्हा सेवेत यायची त्यांना सवय झाली आहे. रेल्वे पोलीस आयुक्तालय हे स्वतंत्र असल्यामुळे या मुजोर पोलिसांचे फावल्याचे एका सहायक आयुक्तांनी सांगितले. या पोलिसांच्या राज्य पोलिसांअतर्गत बदल्या झाल्या, तर त्यांना आपसूकच वचक बसेल, असे मतही या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
पहाटेच्या वेळी पहिल्या गाडीत अनेक नवखे प्रवासी असतात. त्यापैकी काही चुकून प्रथम श्रेणीच्या वा अपंगांच्या डब्यात शिरतात. दादर येथे अशा नवख्या प्रवाशांना चढू दिले जाते. त्यापाठोपाठ पोलिसांची एक टोळी डब्यात शिरते. या सर्व नवख्या प्रवाशांना कारवाईसाठी माटुंगा स्थानकात उतरविले जाते. त्यांना १२०० रुपये दंड भरण्यास सांगितले जाते, परंतु इतके पैसे नसल्यामुळे तुरुंगाची भीती दाखविली जाते आणि त्यांच्याकडे असतील ते पैसे काढून घेतले जातात. हे प्रकार सर्रास घडत असतात. अशा तक्रारी आपल्याकडेही आल्याचे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. आपण या पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी स्वत:च आता घटनास्थळी जाणार आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांच्याकडेही अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या आहेत. त्यांनीही रेल्वे पोलिसांना वचक बसण्यासाठी कारवाई करण्याचे ठरविले आहे.     

रेल्वे सुरक्षा बलाचीही दादागिरीच..
रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांकडूनही प्रवाशांना विनाकारण त्रास दिला जातो. अपंगांच्या डब्यात शिरणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी हे सर्व कर्मचारी टपूनच बसलेले असतात. वास्तविक त्यांनी अशा प्रवाशांना अटकाव करणे आवश्यक आहे. परंतु या सर्व प्रवाशांची वांद्रे येथे रेसुबच्या पोलीस ठाण्यात वरात काढली जाते. तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल, असे सांगून पैसे उकळण्याचाच धंदा बिनबोभाटपणे सुरू असल्याचे सांगितले जाते.

Story img Loader