मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे त्वरित सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व रेल्वे संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. भर पावसातही आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे तब्बल दोन तास ‘देवगिरी’ रेल्वे अडविण्यात आली. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अर्थसंकल्पात मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत सोडण्यास मंजुरी दिल्यानंतर लातूरची रेल्वे नांदेडला सोडल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा इशारा लातूरच्या नेत्यांनी दिला होता. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी नांदेडची गाडी सुरू करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे आंदोलन करण्यात आले.
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाही पावसाची पर्वा न करता आंदोलक रेल्वेस्थानकावर सकाळी ७.१५ वाजता मोठय़ा संख्येने जमले. आंदोलनात महिला व विद्यार्थी मोठय़ा संख्येत सहभागी झाले. बिलोली-देगलूर तालुक्यातून काँग्रेसचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. ‘आम आदमी’ पार्टीचे कार्यकर्ते डोक्यावर टोप्या घालून आले होते. सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, रिपाइं, आम आदमी पार्टी, स्वातंत्र्यसनिकांनी सहभाग नोंदविला होता. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार व त्यांचे कार्यकत्रे वगळता शिवसनिकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
या वेळी खासदार खतगावकर म्हणाले, रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर झालेली मुंबई-लातूर एक्सप्रेस नांदेडपर्यंत सोडण्यास मान्यता देण्यात आली. नांदेड-बिदर नवीन रेल्वेमार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करणे, नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडणे या प्रमुख तीन मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. सुधाकरराव डोईफोडे म्हणाले, की रेल्वेमंत्र्यांच्या पक्षपाती धोरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे. लातूरकरांची भूमिका दुष्टपणाची असल्यामुळे मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडपर्यंत आली नाही. रेल्वेमंत्री लातूरकरांच्या उपकाराखाली दबलेले आहेत. देशाचा रेल्वेमंत्री धोरणाला हरताळ फासत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही.
देवगिरी एक्प्रेसचे आगमन नांदेड रेल्वेस्थानकावर सकाळी ९.३५ वाजता झाले. खासदार भास्करराव पाटील खतगावकर, सुधाकरराव डोईफोडे, आ. ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आिदनी रेल्वे इंजिनवर उभे राहून रेल्वे रोको आंदोलन केले.
रेल्वेने आपले आश्वासन पाळले नाहीतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन हे आंदोलन समाप्त झाल्याची घोषणा केल्यानंतर दुपारी १२ वाजता देवगिरी हैदराबादकडे प्रयाण झाली.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी रेल्वे रोको केल्याच्या आरोपाखाली आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन २२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader