दौंड-नगर-मनमाड रेल्वे मार्गाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली नगर रेल्वे स्थानकावर आज सकाळी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. नवी दिल्ली- बंगळूर-कर्नाटक ही गाडी नगर स्थानकात ३० मिनिटे थांबवून धरण्यात आली.
उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेवक नितिन शेलार, दत्ता कावरे, मालनताई ढोणे, सोनाबाई शिंदे, तसेच युवा मोर्चाचे सुवेंद्र गांधी, विजय मुथा, मनेष साठे, सुनिल रामदासी,
विलास नंदी व श्रीगोंदे, नगर तालुका येथील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित
होते.
खासदार गांधी यांनी सांगितले की खासदारकीच्या दोन्ही टर्ममध्ये या मार्गाचा प्रश्न आपण वारंवार रेल्वे मंत्रालयाकडे उपस्थित केला आहे. या मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण होणे गरजेचे असल्याने त्याचा सतत पाठपुरावा केल्यामुळे रेल्वे मंत्रालयाचे विद्युतीकरणाचे काम सुरू केले मात्र दुहेरीकरणाचे काम प्रलंबित ठेवले आहे. नगर-बीड-परळी या मार्गासाठी केंद्राचे २०० कोटी व राज्याचे २०० कोटी मिळावे अशी मागणी केली, मात्र केंद्र तसेच राज्य सरकारही टोलवाटोलवी करत आहे.
याशिवाय नगर पुणे मार्गे श्रीगोंदे अशी लोकल रोज सुरू करावी अशीही मागणी केली आहे. ही लोकल सुरू झाली तर नगरहून पुण्याला फक्त दीड तासात पोहचता येईल व रस्त्यावरची वाहतूक बरीचशी कमी होऊन जीवघेण्या अपघातांचे प्रमाणही कमी होईल अशी खात्री गांधी यांनी व्यक्त केली. नगरशी संबधित अरणगाव, निंबळक, राहुरी येथील उड्डाणपुलाचे कामही रेंगाळले आहे. या सर्व विषयांची जाग रेल्वे प्रशासनाला यावी यासाठी आजचा रेल्वे रोको आहे असे गांधी यांनी सांगितले.

Story img Loader