गोंदिया-बल्लारशादरम्यान धावणारी पॅसेंजर वडेगाव-अरुणनगर ते वडसा स्थानकादरम्यान या गाडीच्या इंजिनासह ८ डबे रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास रूळावरून घसरल्याने ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बाथरूममध्ये अडकलेल्या २ प्रवाशांना काढावे लागले आहे. उर्वरित प्रवासी सुखरूप असून या घटनेमुळे गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. आज या मार्गावरील गोंदिया-चांदा फोर्ट मार्गावरील चारही गाडय़ा रद्द करण्यात आल्याची माहिती गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर बी.व्ही.टी.राव यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलतांना दिली.
स्टेशन मास्तरांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जी.सी.गोंदिया-चांदाफोर्ट पॅसेंजर सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान रविवारी गोंदियावरून चांदाफोर्टकडे रवाना झाली. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास वडेगाव-अरुणनगर-वडसा दरम्यान पॅसेंजरच्या इंजिनासह २ डबे उलटले आणि ६ डबे रेल्वे रूळावरून खाली घसरले, तर रेल्वे इंजिन रूळावरून काही अंतरावर जाऊन पडले. पॅसेंजरने ट्रॅक सोडल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. इंजिनजवळच्या डब्यातील ८ प्रवासी जखमी झाले, तर दोन प्रवासी शौचालयात अडकले. तथापि, या पॅसेंजरमध्ये प्रवासी कमी असल्यामुळे फक्त मनोहर वाघधरे (२५) हाच गंभीर जखमी झाला असून त्याला नियमानुसार ५ हजार रुपये मदत दिल्याचे दपूम रेल्वेने म्हटले आहे. इतर प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती राव यांनी दिली.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एल. वर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा व्यवस्थापक ए.के. सत्पथी, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता व्ही.व्ही.एस. राव, सिग्नल व दूरसंचार अभियंता आर. कुमार यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. तसेच गोंदिया स्थानकावरूनही मदतकार्य करण्याकरिता चमू पाठविण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मदकार्याचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. पोलिसांनीही श्वानपथकाच्या सहाय्याने पाहणी करून, या घटनेमागे नक्षलवाद्यांचा हात असण्याची शक्यता पडताळून पाहिली. या अपघातामुळे गोंदिया-चांदाफोर्ट व चांदाफोर्ट-गोंदिया हे दोन्ही मार्ग ठप्प झाले आहेत. आज संपूर्ण दिवस व आजची रात्र मदतकार्य युद्धस्तरावर सुरू राहणार असून ते उद्या, मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज या मार्गावरील ५८८०१/५८८०२ गोंदिया-बल्लारशा-गोंदिया, ५८८०३, चांदाफोर्ट-गोंदिया, ५८८०८ वडसा-चांदाफोर्ट, ५८८०५ चांदाफोर्ट-गोंदिया या गाडय़ा रद्द करण्यात आल्या. गोंदिया- बल्लारशा-गोंदिया मेमुही रद्द करण्यात आली असून ती उद्या, मंगळवारीही धावणार नाही. यामुळे या स्थानकांवरून जाणाऱ्या प्रवाशांची, तसेच गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सडक-अर्जुनी, साकोली, अर्जुनी मोरगाव तालुक्यापर्यंत अप-डाऊन करणारे शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
गोंदिया-बल्लारशा पॅसेंजरचे ८ डबे रूळावरून घसरले, ८ जखमी
गोंदिया-बल्लारशादरम्यान धावणारी पॅसेंजर वडेगाव-अरुणनगर ते वडसा स्थानकादरम्यान या गाडीच्या इंजिनासह ८ डबे रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास रूळावरून घसरल्याने ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बाथरूममध्ये
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-07-2013 at 09:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway accident in gondiya