गाडी उशिराने पोहोचली, एखाद्याचा जीव गाडीखाली गेला किंवा कोणत्याही कारणामुळे गाडी रखडली की, मोटरमनला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. गेल्या काही दिवसांमध्ये प्रवाशांनी मोटरमनला चोप दिल्याचा अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे मोटरमनना या संतापापासून लांब ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने थेट मोहीमच हाती घेतली आहे. ‘मला कशाला मारता, माझी काय चूक?’ असे वाक्य लिहिलेली काही पोस्टर्स मध्य रेल्वेने छापत थेट प्रवाशांना भावनिक आवाहन केले आहे.
अंधेरी-मानखुर्द या गाडीखाली आल्याने १४ जुलै रोजी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी संतप्त लोकांनी आणि प्रवाशांनी मानखुर्द स्थानकाची तोडफोड केली. स्टेशन मास्तरांची खोली तोडल्यानंतर प्रवाशांनी आपला मोर्चा मोटरमन सुनील शिंदे यांच्याही कानाखाली मारली होती. याआधीही मोटरमनवर हात उचलल्याची प्रकरणे समोर आली होती.
त्यानंतर मध्य रेल्वेने ही बाब अतिशय गंभीरपणे हाताळण्याचा विचार केला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने ‘मला कशाला मारता, माझी काय चूक?’ असे वाक्य असलेली पोस्टर्स छापली आहेत. लवकरच ही पोस्टर्स लोकल गाडय़ांच्या डब्यांमध्ये लावली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आलोक बोहरा यांनी दिली.
दरम्यान मानखुर्द स्थानकात झालेल्या उद्रेकाबाबत रेल्वे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी रेल्वे स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची मदत घेतली. प्रशांत गवई, प्रतीक गवई, रोहित गवई आणि इलेन अशी या चार जणांची नावे आहेत. त्याशिवाय रेल्वे पोलीस आणखी तिघांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा