मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागरुकता सप्ताह’ आयोजित करण्यात आला. जनतेशी व्यवहारात पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दोन्ही झोनचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. भारतीय वायुदलाच्या मेंटेनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल जगदीश चंद्र हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी जगदीशचंद्र यांनी ‘सरकारी कामकाजात प्रामाणिकपणा व पारदर्शकता’ या विषयावर विचार मांडले. भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी युवा पिढीने समोर येऊन सामान्य जनतेत भ्रष्टाचाविरुद्ध जागरूकता आणण्याची आणि जगात आमच्या देशाची चांगली प्रतिमा निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणानंतर प्रेक्षकांसमवेत त्यांची प्रश्नोत्तरे झाली.
द.पू. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.एल. वर्मा यांनी प्रास्ताविकात सतर्कता जागरूकता सप्ताहासारखे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर आयोजित करण्यामागील भूमिका आणि त्याची आमच्या जीवनातील आवश्यकता याबाबत विचार मांडले. आपल्या कार्यप्रणालीत आणखी पारदर्शकता आणण्याची आवश्यकता असून, सामान्य जीवनात धोकेबाजी आणि भ्रष्टाचारासारख्या घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाईची गरज आहे, असे मत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी समारोप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी अजनी येथील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘नमक का दारोगा’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक उदय बोरवणकर यांनी आभार मानले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा