मराठी माणसाकडे रेल्वे मंत्रीपद आल्याने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भाच्या पदरात ठोस काहीतरी पडेल, अशी आशा बागळून असलेल्या वैदर्भीयांची घोर निराशा झाली. आधीच मंजूर असलेल्या नागपूर-वर्धा या तिसऱ्या मार्गासाठी नवीन योजना लवकरच जाहीर करण्यात येईल, ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा एवढीच काय ती वैदर्भीयांसाठी समाधान बाब ठरावी.
महाराष्ट्रातील रेल्वे समस्यांची जाण असलेले रेल्वेमंत्री आणि विदर्भातील दोन खासदार केंद्रीय मंत्रिमंडाळात असल्याने विदर्भात रेल्वे मार्गाचे जाळे अधिकाधिक पसरविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील, नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचे प्रलंबित प्रकल्प तडीस जातील तसेच नवीन मार्ग टाकून मागास भागातील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा रेल्वे अर्थसंकल्पाकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु नागपूर-नागभीड, यवतमाळ-मूर्तीजापूर, यवतमाळ-वर्धा-नांदेड मार्ग या मार्गाचा साधा उल्लेखही रेल्वेमंत्र्यांच्या भाषणात आलेला नाही.
अमरावती येथील मालगाडीचे डबे निर्मिती कारखाना आणि नागपूर येथे नीर बॉटलिंग प्लान्टचा समावेश आहे. या आधीच्या रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केलेले प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांची दखल प्रभूंनी घेतलेली नाही. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी बल्लारपूर-मुंबई अशी नवीन गाडी मिळणार असल्याचे रेल्वे अर्थसंकल्पाआधी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र प्रभूंच्या अवकृपेने अहीर तोंडघशी पडले आहेत. रेल्वेने मागील अर्थसंकल्पातील नागपूर-पुणे, नागपूर-अमृतसर साप्ताहिक गाडी आणि मुंबई-काजीपेठ (बल्लारपूर मार्गे) साप्ताहिक गाडी अद्याप सुरू केलेली नाही आणि नवीन गाडी सुरू करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
आधीच्या रेल्वे मंत्र्यांनी चांदा फोर्ट-नागभीड दुसरा मार्ग आणि भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसरा मार्ग घोषणा केली. त्याचे काम सुरू झालेले नाही. या रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद नाही. या रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भाला आशादायक बाब म्हणजे नागपूर-वर्धा तिसरा मार्गासाठी नवीन योजना करण्याची घोषणा होय. मागच्या १५ वर्षांपासून ब्रॉडगेज प्रकल्प, नवीन मार्ग यांच्या समावेश नाही. सामान्य श्रेणीचे डबे वाढवण्यात आल्या आहेत. परंतु सुरक्षितेतच्या दृष्टीने काहीही नाही. नवीन गाडय़ांची घोषणा करण्यात आली नाही. जे प्रकल्प राबविले जाणार आहेत, त्याला किती निधी लागणार, त्यासाठी किती पैसा कुठून येणार, ते प्रकल्प किती कालावधीत पूर्ण होणार याची काहीही उल्लेख नाही. दरवाढ केली नाही याचे समाधान असलेतरी अशाप्रकारच्या अर्थसंकल्पामुळे रेल्वे पुन्हा १५ वर्षांच्या आधीच्या स्थिती जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे सरचिटणीस अशोक पाथरीकर म्हणाले. नवीन गाडय़ांची घोषणा करण्यात आली नाही. अत्यंत निराश करणारा हा अर्थसंकल्प आहे. अमरावती, बल्लारपूर, वर्धा, गोंदियासाठी नागपूरहून शटल सेवा सुरू करणे आवश्यक होते. प्रवासी भाडे वाढले नाही, ही दिलासा देणारी बाब आहे, असे प्रवासी महासंघाचे सरचिटणीस विनोद देशमुख म्हणाले.
वडसा-गडचिरोली मार्गाला केवळ १५ कोटी
 वडसा-गडचिरोली हा ४९.५ किलोमीटरचा नवीन मार्ग राज्य सरकार आणि रेल्वे मिळून तयार केला जाणार आहे.  या प्रकल्पाची किंमत ४६५ कोटी रुपये आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ १५ कोटींची तरतूद करण्यात आली. नागपूर-राजनांदगाव हा २२८ किमीचा तिसरा मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत मंजुरी मिळाली आहे. छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज मार्गासाठी २०० कोटी, जबलपूर-गोंदिया मार्गासाठी १६०.५९ कोटी आणि दुर्ग-राजनांदगाव मार्गासाठी ५४ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अलोक कंसल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा