रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाडय़ाची उपेक्षा यावेळीही कायम राहिली. चेन्नई-नगरसोल व निजामाबाद-कुर्ला गाडय़ांमुळे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची सोय झाली. मात्र, लातूर-मुंबई गाडी नांदेडपर्यंत वाढविल्याने उस्मानाबाद व लातूरकर नाराज आहेत. नांदेडचे प्रवासी देवगिरी व नंदीग्रामऐवजी लातूरमार्गे मुंबईला जाणे पसंत करतील. परिणामी नंदीग्राम व देवगिरीवरचा प्रवासी भार कमी होऊ शकेल. त्याचा फायदा औरंगाबादकरांना मिळू शकतो, असे सांगितले जाते. मात्र, मराठवाडय़ातील नेत्यांच्या मागण्या व प्रत्यक्ष तरतूद व्यस्तच असल्याने बहुतांश लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पाने घोर निराशा केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुंबई, पुणे, ठाण्याच्या बरोबरीने औद्योगिक क्षेत्रात वेगाने भरारी घेणारे शहर अशी औरंगाबादची ओळख आहे. वेरुळ-अजिंठय़ासह महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना दरवर्षी किमान ५ लाख लोक भेटी देतात. पर्यटन हा येथील महत्त्वाचा उद्योग. दळणवळणाच्या सोयी औरंगाबाद शहराला अधिक मिळाव्यात, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या अर्थसंकल्पात शहराला झुकते माप मिळेल, अशी रेल्वे काही सुरू झाली नाही. औरंगाबादहून मुंबईस विशेष गाडी सोडावी, अशी मागणी होती. निजामाबाद-कुर्ला गाडी वगळता मुंबईला औरंगाबादहून नवीन गाडी नाही. तुलनेने औरंगाबादहून दक्षिणेत जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढली आहे. चेन्नई-नगरसोल या गाडीमुळे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची सोय होण्याची शक्यता आहे.
लातूरकर संतप्त
लातूरकरांसाठी कोणतीही नवीन घोषणा न करता मुंबई-लातूर ही एकमेव गाडी नांदेडपर्यंत सोडणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केल्यामुळे लातूर जिल्ह्य़ात मोठा असंतोष पसरला आहे. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी हा निर्णय दुर्दैवी असून रेल्वेमंत्र्यांना हा निर्णय बदलण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. भेलचे संचालक अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी असाच निर्णय यापूर्वीही केला होता. लातूरकरांच्या रेटय़ामुळे हा निर्णय रेल्वे प्रशासनाला बदलावा लागला. आताही लातूरकर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा दिला.
माजी मुख्यमंत्री आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नांदेडहून मुंबईला जाण्यास अनेक रेल्वे आहेत. त्यांची गरज असेल तर आणखी नव्या गाडय़ा सोडा. आमची हक्काची गाडी नांदेडला नेणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगितले. उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीरहून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सोडावी, अशी आमची मागणी होती. लातूरहून नांदेडला गाडी जाणार असेल, तर लातूरच्या प्रवाशांसाठी ही खेदाची बाब आहे. नांदेडहून मुंबईला जाताना नांदेडचेच प्रवासी सामान्य बोगीत भरून येतील. त्यामुळे लातूरच्या गोरगरीब जनतेचे हाल होतील. अगोदरच रेल्वे अपुरी पडते आहे, त्यामुळे हा निर्णय बदलण्यासाठी जेलभरो आंदोलन करू, असा इशारा दिला. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी हा अतिशय दुर्दैवी निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. लातूरकरांसाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी लातूरहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे १५ दिवस अगोदरही आरक्षण मिळत नाही. आणखी स्वतंत्र रेल्वे सुरू होईल इतके प्रवासी आहेत. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय बदलण्यासाठी आंदोलन करावे लागले होते. आता जनतेला हा निर्णय पटला नसेल तर त्यांनी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
हिंगोलीमार्गे मुंबईला साप्ताहिक गाडी
नागपूरहून मुंबईला आठवडय़ातून एकवेळ जाणारी गाडी हिंगोलीमार्गे जाईल. या गाडीसाठी हिंगोलीकरांनी मोर्चे काढले होते. खासदार सुभाष वानखेडे यांनी या साठी प्रयत्न केले होते. वाशीम-माहूर-आदिलाबाद या नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणही करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.
उस्मानाबादकरांची निराशा
उस्मानाबादकरांची मात्र साफ निराशा झाली. सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्गासाठी तरतूद झाली नाही. हैदराबाद-पुणे ही आठवडय़ातून तीन वेळा, तर कोल्हापूर-नागपूर ही आठवडय़ातून दोन वेळा धावणारी रेल्वे दररोज धावावी, अशी मागणी होती. याबरोबरच पंढरपूर-तिरुपती, पंढरपूर-अकोला व उस्मानाबाद-मुंबई पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणीही प्रस्तावित होती, ती पूर्ण झाली नाही.
बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली-मलकापूर मार्गासाठी तरतूद केली. त्यामुळे भविष्यात सोलापूर-बऱ्हाणपूर रेल्वेचे चित्र आशावादी असल्याची प्रतिक्रिया रेल्वे लोक आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपाणीकर यांनी व्यक्त केली.
रेल्वे अर्थसंकल्पाने केली मराठवाडय़ाची निराशा
रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाडय़ाची उपेक्षा यावेळीही कायम राहिली. चेन्नई-नगरसोल व निजामाबाद-कुर्ला गाडय़ांमुळे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची सोय झाली. मात्र, लातूर-मुंबई गाडी नांदेडपर्यंत वाढविल्याने उस्मानाबाद व लातूरकर नाराज आहेत. नांदेडचे प्रवासी देवगिरी व नंदीग्रामऐवजी लातूरमार्गे मुंबईला जाणे पसंत करतील. परिणामी नंदीग्राम व देवगिरीवरचा प्रवासी भार कमी होऊ शकेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2013 at 05:09 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway budget make upset to marathwada