* नागपूरला रेल्वे इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी केंद्र
* अजनी- वाशीम रेल्वे
* हिंगोली मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* नागपूर-नागभीड मार्गाचे रुंदीकरण
* नक्षलग्रस्त भागातील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
* नरखेड पॅसेंजर, भुसावळ-अमरावती पॅसेंजरचा विस्तार
* अमरावती-जबलपूर आता दररोज
नागपूरला रेल्वे इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचे बहुविभागीय प्रशिक्षण केंद्र, अजनी-वाशीम रेल्वे, हिंगोली मार्गे नागपूर (अजनी) लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, दोन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, नरखेड मार्गावर पॅसेंजर, एका गाडीचा विस्तार आणि फेऱ्यांमध्ये वाढ, नागपूर-नागभीड मार्गाचे रुंदीकरण तसेच नक्षलवादग्रस्त भागातील नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण, या घोषणांशिवाय आजच्या रेल्वे अर्थसंकल्पातून विदर्भाच्या पदरी काहीच पडले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या वडसा-गडचिरोली या प्रस्तावित रेल्वे मार्गाला यावेळी अनुल्लेखाने मारण्यात आले.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पश्चिम विदर्भासाठी महत्वपूर्ण अशा अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरणासाठी कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने पुन्हा निराशाच वाटय़ाला आली आहे. मलकापूर-चिखली या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. २०११ मध्ये खामगाव-जालना मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा करण्यात आली होती. जालना-खामगाव-मलकापूर-चिखली, असा २४० किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे प्रकल्प १ हजार २६ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय, वाशीम-माहूर-आदिलाबाद या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाच्या कामाला मात्र गती मिळू शकलेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गाचा उल्लेखही नाही.
अमरावती-नरखेड हा रेल्वे मार्ग तयार होऊनही इंदोर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या आठ फेऱ्या वगळता या मार्गावर प्रवासी गाडी धावलेली नाही. या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झालेले नसल्याने डिझेल इंजिनाची वाहतूक सुरू आहे. रेल्वेमंत्र्यांनी या मार्गावर नवीन अमरावती ते नरखेड पॅसेंजर, तसेच भुसावळ-अमरावती पॅसेंजरचा नरखेडपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील प्रवाशांना थेट वरूड, नरखेडपर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळेल. या मार्गावर गेल्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या इंदोर-यशवंतपूर आणि अजमेर-सिकंदराबाद या दोन एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेल्या नाहीत. अमरावती-पुणे (लातूरमार्गे) देखील अडकून पडली आहे.
अमरावती-जबलपूर ही आठवडय़ातून तीन दिवस धावणारी एक्स्प्रेस आता दररोज झाली आहे. नव्याने मंजूर झालेल्या अजनी (नागपूर) ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस हिंगोली मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत जाईल, पुरी-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस आदी गाडय़ांचा फायदा पश्चिम विदर्भाला मिळू शकेल. पश्चिम विदर्भातून मराठवाडय़ात जाण्यासाठी गाडय़ांच्या संख्येत वाढ होत असतानाही कोकणात जाण्यासाठी कोणतीही गाडी नाही. भुसावळ-हजरत निझामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस नरखेडमार्गे सुरू होण्याची अपेक्षाही पाण्यात गेली आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून रखडलेल्या नागपूर-नागभीड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या दंडकारण्य भागात रेल्वेचे जाळे विणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. छत्तीसगडमध्ये असलेल्या व सिरोंचाला अगदी लागून असलेल्या भोपालपटनम-सुरजागड-बिजापूर या नव्या मार्गासाठी आज सर्वेक्षणाची घोषणा करण्यात आली. बिजापूर ते किरंदूल आणि तिथून सुकमा या मार्गाचे सर्वेक्षण सुद्धा आज जाहीर करण्यात आले. याशिवाय, आदिलाबाद ते मंचेरियल या मार्गासाठी सुद्धा सर्वेक्षणाची तयारी दाखवण्यात आली. गडचांदूर ते आदिलाबाद या मार्गाला मात्र यातून वगळण्यात आले. दिल्ली-मद्रास मार्गावर असलेल्या या भागातील प्रवाशांसाठी काही नवीन गाडय़ा दिलासा देणाऱ्या ठरतील.
गांधीधाम ते विशाखापट्टणम, बिकानेर ते चेन्नई, यशवंतपूर ते निजामुद्दीन या गाडय़ांचे दिवस वाढवण्यात आले. बल्लारपूर ते मुंबई या मार्गावर थेट गाडी सुरू करण्याची मागणी मात्र फेटाळण्यात आली आहे. याशिवाय, सध्याच्या सेवाग्राम एक्स्प्रेसला लिंक एक्स्प्रेसचा दर्जा मिळेल, ही अपेक्षा सुद्धा फोल ठरली. नागपूर-चंद्रपूर मार्गावर गाडी मिळण्याची अपेक्षा पूर्ण न केल्याने या मार्गावरील प्रवासी निराश झाले आहेत. प्रशांती निलयम पुट्टपर्ती ही नवीन गाडी सुरु होणार आहे.  गतवर्षी हैद्राबाद-नागपूर-हैद्राबाद ही रेलसेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचा उल्लेखसुध्दा नाही. एपी एक्सप्रेसचा वध्र्यात थांबा हवा, या मागणीलाही पाने पुसण्यात आली आहेत. थांबा मिळाला असता तर जागतिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सेवाग्राम-पवनारच्या पर्यटकांसाठी एक चांगली सेवा मिळाली असती.    

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Story img Loader