रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, ओपन लाइन शाखेतर्फे साहाय्यक विभागीय अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. सीआरएमएस ओपन लाइन शाखेचे चेअरमन अनिल निरभवणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी मोठय़ा संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
आयओडब्ल्यू आणि सीएचई विभागातील रिक्त जागा भराव्यात, पानेवाडी रस्त्याचे दुरुस्तीकरण करून या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रेल्वे कॉलनीतील रस्ते खराब झाले असून रेल्वे वसाहतीतील घरांचीही दुरवस्था झाली आहे. यात तात्काळ सुधारणा करावी, तब्बल बाराशे रेल्वे क्वॉर्टरसाठी एकही प्लम्बर उपलब्ध नाही, येथे किमान तीन प्लम्बरांची व्यवस्था करावी. फिल्टर हाऊस व २८ युनिट रेल्वे कॉलनीत पाणी वितरणाची योग्य ती व्यवस्था करावी, रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅक पेट्रोलिंगसाठी दोन पेट्रोलिंग कर्मचारी नियुक्त करावेत, रेल्वे ट्रॅक मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांना हिवाळ्यासाठी विशेष पोशाखाची व्यवस्था करावी व या कर्मचाऱ्यांना उच्चदाबाची बॅटरी उपलब्ध करून द्यावी तसेच रेल्वे ट्रॅक दुरुस्ती कामगारांना दुर्घटनास्थळी पोहचण्यासाठी रेल्वे गाडय़ांमध्ये स्वतंत्र डब्याची व्यवस्था करावी इत्यादी मागण्यांचे निवेदन मंडल रेल प्रबंधक यांना सादर करण्यात आले. सचिव मो. इरफान, कोषाध्यक्ष विवेक भालेराव, सी. आर. बालेराव सहभागी झाले होते.