रेल्वेला मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या अनेक सुटय़ा भागांचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची दुरुस्ती आणि तपासणी होणाऱ्या मध्य रेल्वेच्या वाडीबंदर आणि माटुंगा या दोन्ही यार्डामध्ये विविध सुटय़ा भागांची अदलाबदल केली जात असून वेळीच हा तुटवडा भरून न काढल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मध्य रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची संख्या दरवर्षी वाढत असली, तरी त्या प्रमाणात सुटय़ा भागांची खरेदी केली जात नसल्याचे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ही अदलाबदल नसून शिलकीत असलेले भागच या यार्डामध्ये पाठवले जात असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती वाडीबंदर यार्डात तर मासिक देखभाल दुरुस्ती माटुंगा येथील मुख्य यार्डात होते. मात्र मेल-एक्स्प्रेससाठी आवश्यक असलेल्या बॅटरी, डोअर लॉक, बॅरल बोर्ड, ब्रेकसाठी आवश्यक असलेले डिस्ट्रीब्युटर व्हॉल्व्ह आदी महत्त्वाच्या सुटय़ा भागांची कमतरता आहे. गाडीतील दिवे, पंखे, मोबाइल चार्जिग पॉइंट्स यांचीही कमतरता असल्याचे रेल्वे कामगारांकडून सांगितले जाते.
या महत्त्वाच्या भागांशिवाय मेल-एक्स्प्रेस गाडय़ा रुळावर चालूच शकत नाहीत. त्यामुळे मग एखादी गाडी यार्डातच दोन दिवस थांबणार असेल, तर त्या गाडीच्या डब्यांचे भाग काढून दुसऱ्या गाडीला लावले जातात. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार विचारणा करूनही हे सुटे भाग मुबलक प्रमाणात मागवले जात नसल्याचे या यार्डातील कामगारांचे म्हणणे आहे. गाडीसाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांचा सध्या मोठा तुटवडा असल्याचे या कामगारांकडून समजते.
मेल-एक्स्प्रेसच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र रेल्वे बोर्डाकडे सामानाबाबत पाठवली जाणारी यादी अद्ययावत करण्यात आलेली नाही. मुळात रेल्वे बोर्डाकडे मागितला जाणारा निधी कमी गाडय़ांसाठी असतो. त्यात रेल्वे बोर्ड मागितलेल्या निधीपेक्षा कमीच निधी पाठवते. त्यामुळे हा तुटवडा वाढत जातो, असे एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सुटय़ा भागांची कमतरता आहे, असे म्हणता येणार नाही. काही भाग कमी असले, तरी ते तातडीने पुरवले जातात. काही वेळा वॉशरसारखे भाग कमी असतील तर त्यामुळे अख्खी गाडी अडकून राहत नाही. तसेच एका गाडीचे भाग दुसऱ्या गाडीला लावले जात नाहीत. रेल्वेकडे आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्याचा साठा असतो. या साठय़ातूनच हे भाग पुरवले जातात. गाडी रूळावर येताना त्यात सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.

Story img Loader