रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात जाहीर केलेली वाढ २२ जानेवारीपासून, म्हणजे सोमवार- मंगळवारच्या मध्यरात्रीपासून लागू होत आहे. कोटय़वधी रुपयांच्या तोटय़ात चालणाऱ्या रेल्वेच्या सर्वच श्रेणींच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्यात आली आहे. २२ जानेवारीपासून प्रवासाकरता तिकीट काढणाऱ्या किंवा आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना वाढीव प्रवासी भाडे द्यावे लागणार आहेच, शिवाय यापूर्वी प्रवासासाठी आरक्षित तिकीट काढलेल्या प्रवाशांना उद्यापासून प्रवास करताना भाडय़ातील फरक द्यावा लागणार आहे. प्रवासात गाडीतील टीटीईला वाढीव भाडय़ाची रक्कम देऊन पावती घ्यावी असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
वाढलेल्या प्रवास भाडय़ाची रक्कम प्रवासापूर्वी आरक्षण केंद्रावरही जमा करता येणार असून त्यासाठी आरक्षण पर्यवेक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापैकी सोयीचे होईल त्यानुसार वाढीव भाडय़ाची रक्कम निर्धारित रेल्वे कर्मचाऱ्याला देऊन पावती घेण्याची सूचना रेल्वेने प्रवाशांना केली आहे. या पावत्या तपासण्याची सूचना रेल्वे गाडय़ांमधील तसेच रेल्वे स्थानकांवरील तिकीट तपासनीसांना करण्यात आली आहे. बदललेल्या प्रवासी भाडय़ांचा तक्ता रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून दिला जाणार असून, रेल्वेच्या आरक्षण तक्तयातही हे वाढीव भाडे नमूद केले जाणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्रातील खिडकी क्रमांक १० वर ही वाढीव रक्कम भरण्याची सोय करण्यात आली असल्याचे रेल्वेने कळवले आहे.
दरवाढ लागू झाल्यानंतर मुंबईच्या प्रवासासाठी शयनयान श्रेणीत ५० रुपये, तर वातानुकूलित तृतीय श्रेणीसाठी ८३ रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. इतर महानगरांसाठी हेच वाढीव भाडे असे : नवी दिल्ली- शयनयान ४३६ रुपये, एसी प्रथम श्रेणी २८०४, एसी टू टियर १६३५, एसी थ्री टियर ११३४ रु. पुणे- शयनयान ३३३ रुपये, एसी थ्री टियर १३८५ रुपये, चेन्नई- शयनयान ४३६ रुपये, एसी प्रथम श्रेणी २८०४, एसी टू टियर १६३५, एसी थ्री टियर ११३४ रुपये, हैद्राबाद २९९ रुपये, एसी प्रथम श्रेणी १८५३, एसी टू टियर १०९५, एसी थ्री टियर ७७२ रुपये.

Story img Loader