मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे गाडय़ांवर पडणारे दरोडे, लूटमारीचे प्रकार व अन्य गुन्हे विचारात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. परंतु रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी मनुष्यबळ अपुरे असून १२० सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावर अद्याप पाठपुरावा करूनदेखील सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते सोलापूर जिल्ह्य़ातून लोकसभेत प्रतिनिधित्व करीत असताना रेल्वे सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने प्रवासी वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.
सोलापूर रेल्वे विभागात सुरक्षा कर्मचाऱ्यांची ४५० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३३० सुरक्षा कर्मचारी उपलब्ध आहेत, तर अद्याप १२० सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अलीकडे सोलापूर विभागात रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने जिकिरीचे झाले आहे. धावत्या गाडय़ांवर दरोडे घालून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. काल सोमवारी रात्री पुणे-सोलापूर इंटरसिटी गाडीवर सोलापूरच्या अलीकडे दरोडेखोरांनी दगडफेक करीत प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु सुदैवाने गाडी न थांबल्याने किंवा धावत्या गाडीत दरोडेखोरांचा शिरकाव होऊ न शकल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचू शकली नाही. मात्र प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांना लुटण्याच्या प्रकारांचा आढावा घेता रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध माहिती अशी की, २०११ साली सोलापूर विभागात गुंगीचे औषध देऊन लुबाडण्याचे सहा प्रकार घडले होते. तर गेल्या २०१२ वर्षांत अशा गुन्ह्य़ांची संख्या केवळ एकने घटली. दरोडे पडण्याचे प्रकार पाचवरून एकपर्यंत खाली आले खरे; परंतु जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्य़ात वाढ झाल्याचे दिसून येते. २०११ या वर्षी जबरी चोऱ्यांचे तीन गुन्हे नोंद झाले होते. परंतु २०१२ या वर्षांत त्यात वाढ होऊन नऊ गुन्हे घडल्याची नोंद रेल्वे प्रशासनाकडे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, अनेक वेळा रेल्वे गाडय़ांमध्ये लुटले गेल्यानंतर प्रवाशांना पुढचा प्रवास
महत्त्वाचा असल्याने त्यांच्याकडून त्या त्या ठिकाणी गुन्ह्य़ांची फिर्याद नोंदविताना अडचणी येतात. किंबहुना काही वेळा संबंधित यंत्रणेकडूनही गुन्हे नोंदवून घेताना सकारात्मकता दाखविली जात नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून खासगीत मान्य केली जाते. परंतु पुरेसे सुरक्षा मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जाते.
या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोलापूर विभागासाठी अद्याप १२० सुरक्षा जवानांची कमतरता असल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी २५ कर्मचाऱ्यांची तुकडी मिळाली होती. नंतर ती परत गेल्याचे गायकवाड सांगतात. दोन वर्षांपूर्वी आवश्यकतेनुसार १२० सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याचा पाठपुरावाही सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु पाठपुरावा होत असतानादेखील प्रत्यक्षात आवश्यक सुरक्षा कर्मचारी मिळत नसल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा