मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गासंदर्भात केवळ राजकीय लाभ मिळावा म्हणूनच आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला गेला होता की काय असे वाटावे इतपत सध्या लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते.
पूर्वी धुळ्याहून मुंबईकडे रेल्वेतून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता केवळ कुर्ला (मुंबई) स्थानकापर्यंतच जाता येते. तेथून पुढे जाण्याचे ठरविल्यास धुळ्यापासून रस्तामार्ग स्वीकारला जातो. परंतु उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी काही करता येते काय एवढा विचार देखील लोकप्रतिनिधींच्या मनात येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल. ज्यांना रस्तामार्ग पसंत नाही ते लोकप्रतिनिधी चाळीसगावहून थेट मुंबईपर्यँत जाणाऱ्या रेल्वेचा आधार घेतात. पण धुळे-चाळीसगाव या रेल्वे सेवेतूनच प्रवाशांसाठी महत्वाकांक्षी ठरू शकतील असे बदल घडवून आणण्याची इच्छा कोणाची दिसत नाही. जे असा प्रयत्न करतात त्यांना राजकीय नेत्यांचा फारसा पाठिंबा मिळत नाही.
ब्रिटीश राजवटीत निर्मिती झालेल्या येथील रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाची जेवढी गरज आहे तेवढीच या अस्तित्वातील रेल्वे मार्गाच्या माध्यमातूनच प्रवाशांचे निरनिराळे प्रश्न कसे मार्गी लागतील, यासाठी प्रामुख्याने लोकप्रतिनिधींनी सर्व राजकीय ताकद वापरण्याची गरज आहे. अमृतसर-कुर्ला एक्स्प्रेस ही गाडी थेट दादर स्थानकापर्यंत किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत नेण्यात यावी अशी मागणी आहे. दादपर्यंत पोहोचविणारी ही गाडी आता कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथेच संकुचित करण्यात आली आहे. याऐवजी धुळ्याहून मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र गाडी सोडणे किंवा सद्यस्थितीत मनमाडहून मुंबईकडे दररोज सकाळी सुटणाऱ्या गाडय़ा मनमाडऐवजी धुळ्याहून सोडण्यासारखे पर्यायही स्वीकारता येऊ शकतात. तत्पूर्वी धुळे स्थानकावरील फलाट व त्यावरील छपराची लांबी वाढविण्याचे काम अग्रक्रमाने करणे, धुळे-चाळीसगाव पॅसेंजर रेल्वे गाडीतील बंद असलेली प्रसाधनगृहे सुरू करणे असे निर्णय लगेच होऊ शकत नसतील तर त्यासाठी लोकप्रतिनिधींची उदासीनताच कारणीभूत आहे.
अमृतसर-कुर्ला एलटीटी एक्स्प्रेस आणि एलटीटी कुर्ला-अमृतसर एक्स्प्रेस यांचा थांबा बदलविणे आणि त्यामुळे प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीसंदर्भात काही महिन्यापूर्वी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे युझर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे माजी सदस्य अॅड. जवाहर पाटील यांनी मध्य रेल्वेचे मुख्य परिचालन प्रबंधक आर. डी. त्रिपाठी यांची भेट गेतली. अमृतसर कुर्ला एलटीटी गाडी कुर्ला येथे पहाटे साडेतीन ते पावणेचारच्या आसपास पोहोचते. प्रवाशांना कुल्र्याहून दादरकडे जायचे म्हटले तर मोठे धोके पत्करावे लागतात. दादर येथे थांबा द्यायचा म्हटला तर येथे वाढती रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांची वाढती संख्या ही कारणे सांगितले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा